NEET 2026 पेपरफुटी प्रकरण : नाशिक कनेक्शनमुळे देशभर खळबळ; इंदिरानगरातून संशयित ताब्यात
NEET 2026 पेपरफुटी प्रकरण : नाशिक कनेक्शनमुळे देशभर खळबळ; इंदिरानगरातून संशयित ताब्यात
लेवाजगत न्यूज नाशिक : देशातील तब्बल २२ लाख विद्यार्थ्यांनी ३ मे २०२६ रोजी दिलेली NEET 2026 परीक्षा कथित पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकशी जोडले जात असून, राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांनी मंगळवारी इंदिरानगर परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयिताने आपली ओळख लपविण्यासाठी वेशभूषा बदलली होती तसेच केसही कापले होते. मात्र, गुन्हे शाखेच्या युनिट दोनने तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेत कारवाई केली. संशयित हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील असून, तो सध्या भोपाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तो शैक्षणिक समुपदेशक म्हणूनही कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.
पेपरफुटीचे केंद्र नाशिक?
कथित पेपरफुटीचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरले असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या रॅकेटचे मुख्य केंद्र नाशिक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या संपूर्ण प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, पेपर महाराष्ट्रातील नाशिक येथूनच लीक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून विविध राज्यांत पाठविण्यात आली. राजस्थानच्या विशेष कृती दलाला हस्तलिखित अंदाजित प्रश्नपत्रिका म्हणजेच ‘गेज पेपर’ मिळाला होता. त्यातील अनेक प्रश्न मूळ NEET परीक्षेतील प्रश्नांशी शब्दशः जुळत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
हरियाणातून बनावट प्रतींचे वितरण
प्राथमिक तपासानुसार, प्रश्नपत्रिकेची एक छापील प्रत नाशिकहून हरियाणाला पाठविण्यात आली होती. तेथे तिच्या अनेक बनावट प्रती तयार करून प्रत्येकी दहा प्रतींचे संच बनविण्यात आले. हे संच राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरसह विविध राज्यांमध्ये समाजमाध्यमांद्वारे फॉरवर्ड करण्यात आल्याचा संशय आहे.
राजस्थान पोलिसांचे पथक नाशिकमध्ये
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान पोलिसांचे विशेष पथक नाशिकमध्ये दाखल होत असून, ताब्यात घेतलेल्या संशयिताला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
दरम्यान, NEET 2026 परीक्षा रद्द झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आली असून, देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत