Contact Banner

११२ वर्षांच्या भक्तीपरंपरेचा गौरव; श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा येथे ११३ वा पाटोत्सव, अभिषेक, ५६ भोग अन्नकूट व महाप्रसाद भक्तिभावात संपन्न

savda-swaminarayan-temple-113th-patotsav-annakut-mahaprasad


११२ वर्षांच्या भक्तीपरंपरेचा गौरव; श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा येथे ११३ वा पाटोत्सव, अभिषेक, ५६ भोग अन्नकूट व महाप्रसाद भक्तिभावात संपन्न


सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : गुजरातमधील पवित्र वडतालधाम अंतर्गत असलेल्या ११२ वर्षे पुरातन श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा येथे श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्णदेव यांच्या ११३ व्या पाटोत्सव (वर्धापन दिन) सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, संतांचे मार्गदर्शन, अभिषेक, अन्नकूट महोत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. वडतालधामचे आचार्य पूज्य राकेशप्रसाददासजी महाराज व सद्गुरू शास्त्री स्वामी धर्मप्रसाददासजी यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला.








पाटोत्सवानिमित्त मंगळवार, दि. २३ जून रोजी भव्य कलश यात्रा व जलयात्रा काढण्यात आली. कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी धर्मकिशोरदासजी, विश्वप्रकाशदासजी, भक्तीप्रियदासजी, शास्त्री श्रीजी स्वामी तसेच शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी यांच्यासह संत मंडळींनी संपूर्ण यात्रेत भाविकांसमवेत पायी सहभाग घेतला. श्री विठ्ठल मंदिरात संतांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी माता व हनुमंतराय यांची आरती करण्यात आली. त्यानंतर विविध नद्यांचे व समुद्राचे पवित्र जल घेऊन जलयात्रा पुन्हा श्री स्वामीनारायण मंदिरात दाखल झाली.

बुधवार, दि. २४ जून रोजी सकाळी श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्णदेव यांचा अभिषेक नेमाडे परिवारातर्फे करण्यात आला. यावेळी पंडित बाबा जोशी यांनी पौराहित्य केले. अभिषेक प्रसंगी भुलेश्वर मंदिराचे कोठारी धर्मस्वरूपदासजी महाराज श्रीकृष्ण मंदिराचे गादीपती माने कर बाबा शास्त्री फैजपूर येथील खंडोबा देवस्थानचे महामंडलेश्वर पवन दासजी महाराज ,सह कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी धर्मकिशोरदासजी, विश्वप्रकाशदासजी, भक्तीप्रियदासजी, शास्त्री श्रीजी स्वामी, शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी तसेच इतर संतगण उपस्थित होते.

सत्संग सभेत संतांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भगवानाने दिलेला मानवजन्म हा केवळ भौतिक सुख-सुविधा मिळवण्यासाठी नसून परमेश्वरप्राप्तीसाठी असल्याचे सांगितले. सत्संग हा जीवनाला योग्य दिशा देणारा प्रकाश असून युवकांनी मंदिराशी जोडले जावे, लहान मुलांनी बालसभांमध्ये सहभागी होऊन संस्कार आत्मसात करावेत आणि प्रत्येक घरात नियमित प्रार्थना व भगवानाचे स्मरण व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी संतांनी सांगितले की, श्री स्वामीनारायण मंदिर हे केवळ दगडांनी उभारलेले भवन नसून हजारो भक्तांच्या श्रद्धा, संतांच्या तपश्चर्या आणि पूर्वजांच्या त्यागातून निर्माण झालेले पवित्र श्रद्धास्थान आहे. ११२ वर्षांचा हा प्रवास म्हणजे चार-पाच पिढ्यांच्या श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा इतिहास असून अनेक संतांच्या मार्गदर्शनातून भक्तीची परंपरा अखंड सुरू आहे.

वर्धापन दिनानिमित्त भाविकांना पाच संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. दररोज प्रार्थना करणे, भगवानाचे स्मरण करणे, आठवड्यातून किमान एकदा मंदिरात दर्शनासाठी येणे, संतांच्या आज्ञेचे पालन करणे आणि आपल्या मुलांना सत्संगाशी जोडणे हे संकल्प जीवनात अंगीकारावेत, असे संतांनी सांगितले.

सत्संग सभेनंतर मंदिरात भव्य अन्नकूट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. भगवान श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्णदेव यांना ५६ भोग अर्पण करण्यात आले. त्यानंतर अन्नकूट आरती संपन्न झाली. आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचे यजमान जगन्नाथ नेमाडे व अशोक नेमाडे परिवारातर्फे भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने हरिभक्त व भाविक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी मंदिरावर सदैव भगवान श्री स्वामिनारायणांची कृपादृष्टी राहावी आणि हे स्थान भक्ती, सेवा, सत्संग व संस्कारांचे केंद्र म्हणून कायम राहावे, अशी प्रार्थना करण्यात आली. “दगडांचे मंदिर उभे राहण्यासाठी वर्षे लागतात, पण भक्तीचे मंदिर उभे राहण्यासाठी आयुष्य घालवावे लागते,” या संदेशातून संतांनी भक्ती, सेवा आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.