Contact Banner

महायुतीच्या अधिकृत उमेदवारासह शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी समर्थित एक आणि अपक्ष अनिल चौधरी यांच्याकडेही लक्ष; जळगाव विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढली

jalgaon-legislative-council-election-interest-grows-around-mahayuti-shiv-sena-ncp-backed-and-independent-candidates



 महायुतीच्या अधिकृत उमेदवारासह शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी समर्थित एक आणि अपक्ष अनिल चौधरी यांच्याकडेही लक्ष; जळगाव विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढली




सावदा लेवाजगत न्यूज श्यामकांत पाटील  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार नंदकुमार महाजन यांनी अर्ज दाखल केला असला, तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून (उ बा ठा) शरद तायडे , शिवसेना दीपक धांडे व रेश्मा काळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समर्थित सावदा येथील सुनील जंगले यांनीदेखील उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतःचा स्वतंत्र प्रभाव असलेले अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक ही नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते. या मतदारसंघात महानगरपालिका , नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदान करतात. त्यामुळे प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त होते. पक्षीय ताकदीबरोबरच स्थानिक पातळीवरील संपर्क, वैयक्तिक संबंध आणि राजकीय समीकरणे यांचाही निकालावर मोठा प्रभाव पडत असतो.

महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून नंदकुमार महाजन यांना भाजपने मैदानात उतरविले असले तरी शिवसेनेच्या दोन उमेदवारांच्या अर्जामुळे स्थानिक पातळीवर विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याने कोण उमेदवारी कायम ठेवणार आणि कोण माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समर्थित सुनील जंगले यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा राजकीय पर्याय समोर आला आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने सावदा शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सावद्याचा राजकीय वारसा यापूर्वीही अधोरेखित झाला आहे. दिवंगत सतीशसिंग गणपतसिंग परदेशी यांनी शिवसेनेच्या उमेदवार म्हणून ही निवडणूक लढविली होती. त्या वेळी त्यांना तब्बल ५८ मते मिळाली होती. विजय मिळाला नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची ताकद दाखवून देणारी ती निवडणूक ठरली होती. आजही त्या निवडणुकीची चर्चा शिवसैनिक आणि राजकीय जाणकारांमध्ये होताना दिसते.

यंदा सावदा येथील सुनील जंगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सावदा पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहे. त्यामुळे जुन्या राजकीय आठवणींना उजाळा मिळत असून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचा पूर्वीचा प्रभाव, महायुतीतील सध्याची परिस्थिती आणि राष्ट्रवादीच्या हालचाली यामुळे ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरत आहे.

दुसरीकडे, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचीदेखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही मतदारांवर त्यांचा प्रभाव मानला जात असल्याने त्यांच्या उमेदवारीकडेही गांभीर्याने पाहिले जात आहे. निवडणुकीतील अंतिम समीकरणांमध्ये अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांशी संपर्क वाढविणे, गाठीभेटी घेणे आणि पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. निवडणुकीच्या पुढील टप्प्यात राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्या तरी महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकुमार महाजन, शिवसेनेचे शरद तायडे व रेश्मा काळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समर्थित सुनील जंगले आणि अपक्ष अनिल चौधरी यांच्यामुळे जळगाव विधान परिषद निवडणूक जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांची भूमिका आणि विविध पक्षांची रणनीती यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.