जळगावात कारमधून एमडी ड्रग्जची विक्री; तिघांना अटक, तिघांचा शोध सुरू दोन वर्षांतील चौथी मोठी कारवाई; १६.११ ग्रॅम एमडी ड्रग्जसह ६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगावात कारमधून एमडी ड्रग्जची विक्री; तिघांना अटक, तिघांचा शोध सुरू
दोन वर्षांतील चौथी मोठी कारवाई; १६.११ ग्रॅम एमडी ड्रग्जसह ६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
लेवाजगत न्यूज | जळगाव प्रतिनिधी-
जळगाव शहरात एमडी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या टोळीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत १६.११ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून आणखी तिघा संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांतील एमडी ड्रग्ज संदर्भातील ही चौथी मोठी कारवाई ठरली आहे.
पोलिसांना शहरात एमडी ड्रग्जचा साठा घेऊन काही जण येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. ३) मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सुरेश जैन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील परिसरात सापळा रचण्यात आला.
या ठिकाणी संशयास्पदरीत्या उभी असलेली पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एस-क्रॉस कार (एमएच २९ बीसी ५१००) पोलिसांनी ताब्यात घेत झडती घेतली. झडतीदरम्यान कारमधील तिघांकडे एमडी पावडरचा साठा आढळून आला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळीच प्राथमिक तपासणी केली असता ती एमडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
तिघांना अटक
या प्रकरणात पोलिसांनी रईस हारुन देशमुख (वय २७, एमआयडीसी पोलिस कॉलनी), तौसिफ सैय्यद आरिफ (वय २१, पिंप्राळा हुडको) आणि लकी रमेश पाटील (वय ३०, देविदास कॉलनी) यांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून १६.११ ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत ४८ हजार रुपये), एक एस-क्रॉस कार (४ लाख रुपये), दोन दुचाकी (१.२५ लाख रुपये) आणि तीन मोबाईल फोन (८० हजार रुपये) असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आणखी तिघांचा शोध
तपासादरम्यान अमजद उर्फ बिल्डर शेख (फातेमा नगर, एमआयडीसी), इम्रान उर्फ इमा हसन हुसेन भिस्ती (शाहूनगर) आणि अनवर पटेल (सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत