गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन ‘आशा - सुमन स्वर सुमनांजली’तून उलगडणार आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांचा संगीत प्रवास
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
‘आशा - सुमन स्वर सुमनांजली’तून उलगडणार आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांचा संगीत प्रवास
जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने मृगोत्सव २०२६ अंतर्गत शनिवार, २० जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात ‘आशा - सुमन स्वर सुमनांजली’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून भारतीय चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील दोन महान गायिका स्व. आशा भोसले आणि स्व. सुमन कल्याणपूर यांच्या संगीत प्रवासाला सुरेल अभिवादन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात येणाऱ्या विविध गीतांमधून या दोन्ही दिग्गज गायिकांच्या गायकीचा प्रवास उलगडला जाणार आहे. त्यांच्या अजरामर गीतांचा आस्वाद रसिकांना घेता येणार असून संगीतप्रेमींसाठी ही एक आगळीवेगळी पर्वणी ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजी) तसेच मा. डॉ. केतकीताई पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका मा. डॉ. वर्षा पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सौ. पद्मजा नेवे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
संगीत, गायन आणि नृत्य यांच्या सुंदर संगमातून साकार होणारा हा कार्यक्रम जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक संस्मरणीय संध्याकाळ ठरणार असून शहरातील संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत