Contact Banner

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तज्ज्ञांची यशस्वी कामगिरी

typhoid-caused-intestinal-perforation-successful-surgery-at-dr-ulhas-patil-hospital-jalgaon


टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तज्ज्ञांची यशस्वी कामगिरी

जळगाव | प्रतिनिधी-

टायफॉईडच्या गंभीर संसर्गामुळे लहान आतड्याला छिद्र (इंटेस्टायनल परफोरेशन) झालेल्या ३५ वर्षीय रुग्णावर येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दहा दिवस विशेष उपचार घेतल्यानंतर रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

typhoid-caused-intestinal-perforation-successful-surgery-at-dr-ulhas-patil-hospital-jalgaon


रुग्णाला ताप, तीव्र पोटदुखी, पोट फुगणे आणि उलट्यांचा त्रास होत होता. तपासणीनंतर टायफॉईडच्या संसर्गामुळे लहान आतड्याला छिद्र पडल्याचे निदान झाले. ही स्थिती अत्यंत गंभीर आणि जीवघेणी असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

शल्यचिकित्सा विभागाचे तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी रुग्णावर एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमीआयलिओस्टॉमी ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. यावेळी ज्युनिअर रेसिडेंट डॉ. अपूर्वा गवई आणि डॉ. प्रणव शेवाळे यांनी सहकार्य केले.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष वैद्यकीय देखरेखीखाली उपचार करण्यात आले. भूलरोग तज्ज्ञ डॉ. शीतल ढाके यांनी शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतरच्या उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि आरोग्यसेवकांच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली.

दहा दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाची प्रकृती समाधानकारक झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या टीमचे आभार मानत वेळेवर निदान, तातडीची शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णाला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त केली.

याबाबत माहिती देताना डॉ. चैतन्य पाटील म्हणाले की, “टायफॉईडचा संसर्ग वेळेवर नियंत्रणात न आल्यास आतड्याला छिद्र पडण्यासारखी गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ताप, पोटदुखी किंवा टायफॉईडची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असून जटिल शस्त्रक्रियांमध्येही यशस्वी उपचार केले जात आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.