५० वर्षीय रुग्णावर स्किझोफ्रेनियाचे यशस्वी उपचार
५० वर्षीय रुग्णावर स्किझोफ्रेनियाचे यशस्वी उपचार
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांचे यश
लेवाजगत, जळगाव : डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या ५० वर्षीय रुग्णावर स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार विभागाने यशस्वी उपचार केले. समुपदेशन व औषधोपचारांच्या माध्यमातून रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून, त्याला पुन्हा सामान्य जीवनाकडे वाटचाल करण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या योजनेअंतर्गत रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले.
काही वर्षांपूर्वी डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर संबंधित रुग्णाच्या वागणुकीत हळूहळू बदल होऊ लागले. तो सतत स्वतःशीच बडबड करणे, कोणतेही कारण नसताना अचानक रडणे, कुटुंबीयांवर विनाकारण संशय घेणे, कोणाशीही संवाद न साधणे तसेच जेवण करण्यास नकार देणे, अशा गंभीर मानसिक लक्षणांमुळे कुटुंबीय चिंतेत होते. विविध ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी रुग्णाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉक्टर हुमेद महाडीक, डॉ. आशिष येवले, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. निकीता खटवानी, डॉ. अभिलाषा राठोड, डॉ. सोनजी गायकवाड, डॉ. रेशल श्रीवास्तव व डॉ. फरीन सुरैय्या यांनी रुग्णाची सखोल तपासणी केली. त्यानंतर रुग्णाला स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचे निदान झाले.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णावर औषधोपचार, नियमित समुपदेशन, मानसिक स्थितीचे सातत्याने निरीक्षण तसेच कुटुंबीयांना आजाराविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने केलेल्या उपचारांमुळे रुग्णाच्या प्रकृतीत टप्प्याटप्प्याने लक्षणीय सुधारणा झाली.
उपचारानंतर रुग्णाची स्वतःशी बडबड करण्याची सवय कमी झाली असून, संशयी वृत्तीवर नियंत्रण आले आहे. तसेच तो नियमित जेवण करू लागला असून कुटुंबीयांशी संवाद साधण्यासही सुरुवात केली आहे. मानसिक आरोग्यात झालेल्या या सकारात्मक बदलामुळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले.
“स्किझोफ्रेनिया हा गंभीर मानसिक आजार असला तरी योग्य वेळी निदान, नियमित औषधोपचार, समुपदेशन आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळाल्यास रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते. मानसिक आजार लपवून न ठेवता तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत उपचार मिळाल्यास अशा रुग्णांना पुन्हा सामान्य जीवन जगता येते.”
— डॉ. निकीता खटवानी, मानसोपचार विभाग, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय




कोणत्याही टिप्पण्या नाहीत