आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून ४ जुलै रोजी रावेर येथे विशेष दिव्यांग तपासणी व UDID प्रमाणपत्र शिबिर
आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून ४ जुलै रोजी रावेर येथे विशेष दिव्यांग तपासणी व UDID प्रमाणपत्र शिबिर
लेवाजगत न्युज रावेर:- प्रतिनिधी-रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज उपलब्ध व्हावा तसेच UDID (Unique Disability ID) दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जळगावपर्यंत जावे लागू नये, यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नांतून आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या सहकार्याने शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, रावेर येथे विशेष दिव्यांग तपासणी व UDID प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत होणार असून, अस्थिरोग, नेत्ररोग, नाक-कान-घसा, बालरोग, मानसोपचार, त्वचारोग तसेच मेडिसीन विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून UDID प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
रावेर व यावल तालुक्यातील ज्या दिव्यांग नागरिकांकडे अद्याप UDID प्रमाणपत्र उपलब्ध नाही, त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी ऑनलाइन अर्ज करूनही प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या लाभार्थ्यांनीही शिबिरात उपस्थित राहावे.
शिबिरासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड (मूळ व छायाप्रत), पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, UDID कार्डसाठी भरलेला ऑनलाइन अर्ज (ऑनलाइन नोंदणी अनिवार्य) तसेच उपलब्ध असल्यास पूर्वीचे वैद्यकीय अहवाल, एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन किंवा इतर संबंधित वैद्यकीय कागदपत्रे सोबत आणावीत.
UDID प्रमाणपत्रामुळे दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय योजना, शैक्षणिक सवलती, प्रवास सवलत, पेन्शन, शिष्यवृत्ती तसेच इतर शासकीय लाभ मिळविणे अधिक सुलभ होते. त्यामुळे पात्र दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपले UDID प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे रावेर व यावल तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना जिल्हा मुख्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नसून, स्थानिक पातळीवरच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने हा उपक्रम दिव्यांगांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत