भुसावळमार्गे धावणार दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस; खान्देशातील प्रवाशांना मोठी सुविधा
भुसावळमार्गे धावणार दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस; खान्देशातील प्रवाशांना मोठी सुविधा
लेवाजगत जळगाव/भुसावळ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवाशांना मोठी भेट दिली असून, देशातील विविध शहरांना जोडण्यासाठी सात नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील दोन गाड्या भुसावळमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणार असल्याने जळगाव, भुसावळसह खान्देशातील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सुभेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन अमृत भारत एक्सप्रेस भुसावळमार्गे धावतील. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रादरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
प्रयागराज–एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस
प्रयागराज ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला साप्ताहिक सेवेची मंजुरी देण्यात आली आहे. ही गाडी सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ आणि कल्याण या प्रमुख स्थानकांवरून धावणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसह खान्देशातील प्रवाशांना थेट आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
सुभेदारगंज–एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस
सुभेदारगंज ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या गाडीला अमृत भारत एक्सप्रेस म्हणून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक १४१२१ आणि १४१२२ या क्रमांकाने ही सेवा आठवड्यातून दोन दिवस सुभेदारगंजहून आणि दोन दिवस मुंबईहून धावणार आहे.
या गाडीचे प्रमुख थांबे फतेहपूर, गोविंदपुरी, बांदा, चित्रकूट धाम, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, खांडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे असे असतील.
सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास
अमृत भारत एक्सप्रेसमध्ये प्रामुख्याने नॉन-एसी डबे असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना लांब पल्ल्याचा तुलनेने स्वस्त आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होतो. नव्या सेवांमुळे देशातील विविध राज्यांमधील प्रवासी संपर्क अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
भुसावळचे महत्त्व वाढणार
मध्य रेल्वेच्या दृष्टीने भुसावळ हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. त्यामुळे दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस भुसावळमार्गे सुरू होणे खान्देशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मुंबई, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक रेल्वे पर्याय मिळणार असून, भविष्यात भुसावळ स्थानकाचे प्रवासी वाहतुकीतील महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत