वाघोदा बु. येथे चोरीस गेलेल्या चार पाण्याच्या मोटार पंपांचा छडा; एक संशयित ताब्यात
वाघोदा बु. येथे चोरीस गेलेल्या चार पाण्याच्या मोटार पंपांचा छडा; एक संशयित ताब्यात
सावदा (प्रतिनिधी): सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोदा बु. येथे शेतातील चार पाण्याचे मोटार पंप चोरीला गेल्याप्रकरणी सावदा पोलिसांनी जलद कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेत चोरीस गेलेले सर्व मोटार पंप जप्त केले आहेत.
दि. 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 दरम्यान परशुराम अशोक भोसले (वय 35), सुभाष आनंद पाचील, शेख चाँद शेख नबी आणि असगर खान अताउल्लाह खान (सर्व रा. वाघोदा बु., ता. रावेर) यांच्या शेतातील एकूण ₹13,500 किंमतीचे चार पाण्याचे मोटार पंप अज्ञात चोरट्याने लंपास केले होते.
याप्रकरणी परशुराम अशोक भोसले यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 195/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सरफराज रहीम तडवी (वय 25, रा. वाघोदा बु., ता. रावेर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत त्याच्या घराची झडती घेतली असता चोरीस गेलेले चारही मोटार पंप घरातून हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी सर्व मोटार पंप जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, सहायक फौजदार विनोद पाटील, पोहेकॉ विनोद तडवी, पोना सुनील सैदाणे, पोलीस कॉन्स्टेबल रवी महाजन, मनोज तडवी व पोलीस कॉन्स्टेबल (चालक) कापडे यांच्या पथकाने केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत