आवरेच्या भोळेनाथ मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारी ‘बम बम भोले’चा जयघोष
आवरेच्या भोळेनाथ मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारी ‘बम बम भोले’चा जयघोष
आवरे | प्रतिनिधी – शिवकुमार म्हात्रे
हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भगवान शिवाची पूजा-अर्चना, अभिषेक, बेलपत्र अर्पण तसेच ‘ॐ नमः शिवाय’चा जप करण्यासाठी या महिन्यात शिवभक्त मोठ्या श्रद्धेने मंदिरांमध्ये गर्दी करतात. याच भक्तिमय वातावरणात आवरे येथील प्राचीन भोळेनाथ मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारी ‘बम बम भोले’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
श्रावण महिना आणि आवरे गावातील भोळेनाथ मंदिर यांचे जणू अतूट नातेच आहे. यंदा तिसरा श्रावणी सोमवार, संकष्टी चतुर्थी आणि मंदिरात सुरू असलेला पारंपरिक श्रीकृष्ण अखंड हरिनाम सप्ताह असा त्रिवेणी संगम साधला. त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्रावणी सोमवारनिमित्त आरती समूहाच्या वतीने भोळेनाथ मंदिरात विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखंड हरिनाम सप्ताहातील सुरेल भजन, ताल-मृदुंगाचा गजर आणि ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत भगवान भोळेनाथाची प्रातःकाळी काकड आरती करण्यात आली.
या काकड आरतीचा मान संत निरंकारी सत्संग, आवरे येथील शिवभक्तांना मिळाला. संत निरंकारी सत्संगाच्या माध्यमातून समाजसेवेचे विविध उपक्रम राबविले जात असून, सेवाभाव आणि भक्तीची परंपरा जपली जात आहे. यावेळी संत निरंकारी सत्संगातील शिवभक्तांनी अत्यंत भक्तिभावाने भगवान भोळेनाथाची आरती केली.
आवरे तसेच पंचक्रोशीतील भाविकांचे भोळेनाथ मंदिर हे श्रद्धास्थान आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणारा आणि नवसाला पावणारा भोळेनाथ अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती.
अखंड हरिनाम सप्ताहातील भजन-कीर्तन, टाळ-मृदुंगाचा गजर आणि शिवनामाच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. तिसऱ्या श्रावणी सोमवारी आवरे येथील भोळेनाथ मंदिरात अशा प्रकारे ‘बम बम भोले’चा नाद घुमत राहिला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत