चंदू अण्णा नगर–खोटेनगर रस्ता दुरुस्तीची मागणी; प्रभाग ९ मधील नागरिकांचे पालकमंत्र्यांकडे साकडे
चंदू अण्णा नगर–खोटेनगर रस्ता दुरुस्तीची मागणी; प्रभाग ९ मधील नागरिकांचे पालकमंत्र्यांकडे साकडे
हजारो नागरिकांचा दररोज प्रवास; पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था, तातडीने दुरुस्तीची मागणी
लेवाजगत न्यूज जळगाव : प्रभाग क्रमांक ९ मधील चंदू अण्णा नगर ते खोटेनगर या महत्त्वाच्या रस्त्याची पावसाळ्यात झालेली दुरवस्था लक्षात घेता, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रा. डॉ. संदिप पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील हे पद्मालय येथील शासकीय विश्रामगृहावर उपस्थित असताना प्रा. डॉ. संदिप पाटील यांनी त्यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द केले. यावेळी रस्त्याच्या सद्यस्थितीचे फोटो व व्हिडिओ दाखवून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती देण्यात आली.
प्रभाग क्रमांक ९ चे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदू अण्णा नगर ते खोटेनगर या मार्गावर सध्या मोठमोठे खड्डे, चिखल आणि खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.
या मार्गावर तालुका पोलीस स्टेशन, तलाठी व महसूल कार्यालय, कचरा फॅक्टरी तसेच मुख्य रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा संपर्कमार्ग असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था केवळ स्थानिक रहिवाशांसाठीच नव्हे, तर शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठीही अडचणीची ठरत आहे.
यावेळी प्रा. डॉ. संदिप पाटील यांनी नवलसिंग राजे पाटील यांच्याशी संवाद साधून रस्त्याच्या समस्येची सविस्तर माहिती दिली. पालकमंत्र्यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन महानगरपालिका आयुक्तांना आवश्यक निर्देश द्यावेत आणि चंदू अण्णा नगर ते खोटेनगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी आग्रहाची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट होत असल्याने प्रशासनाने विलंब न करता कार्यवाही करावी आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत