डॉ.भूषण चौधरी यांना जे.पी. नाईक आदर्श प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित
डॉ.भूषण चौधरी यांना जे.पी. नाईक आदर्श प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित
रावेर | प्रतिनिधी-
शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील प्राचार्य व प्राध्यापकांना प्रदान करण्यात येणाऱ्या जे.पी. नाईक आदर्श प्राध्यापक पुरस्काराने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसचे संचालक प्रा. डॉ. भूषण लीलाधर चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात राज्यातील एकूण ३२ प्राचार्य व प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. डॉ. भूषण चौधरी हे मूळचे खिरोदा, ता. रावेर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील स्व. एल. डी. चौधरी हे अध्यापक विद्यालय, खिरोदा येथे प्राचार्य होते. विशेष म्हणजे, स्व. एल. डी. चौधरी यांनाही सन १९९३ मध्ये राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे वडिलांनंतर मुलालाही राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित होण्याचा मान मिळाल्याने खिरोदा परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
डॉ. भूषण चौधरी यांनी जर्मनी, जपान आणि अमेरिकेत संशोधनकार्य केले आहे. त्यांच्या नावावर विविध संशोधन कार्य असून त्यांचे अनेक संशोधन लेख जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
या पुरस्कार सोहळ्यास शिक्षण संचालक शैलेश देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, शासकीय अभियांत्रिकी विद्यापीठ, पुणेचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
डॉ. भूषण चौधरी यांच्या या सन्मानाबद्दल खिरोदा तसेच रावेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत