गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत नाजनीन शेख, तनुष्का चौधरी, देवांशी चौधरी विजेते
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत नाजनीन शेख, तनुष्का चौधरी, देवांशी चौधरी विजेते
![]() |
| लेवा जगात वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास संपर्क साधा -8983689844 |
लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यंदा या स्पर्धेचे २९ वे वर्ष होते. विविध वयोगटांतील हौशी गायक-गायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सुरेल गायनाने रसिकांची दाद मिळवली.
स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्राचार्या पद्मजा नेवे, परीक्षक देवेंद्र देशमुख (अकोला) तसेच खिरोदा येथील श्रीमती कल्पना गावंडे यांच्या उपस्थितीत झाले.
हौशी गायक-गायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेत बाल गट, किशोर गट आणि प्रौढ गट अशा तीन गटांत स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, गोदावरी करंडक व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रौढ गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २ हजार १, १ हजार ५०१ व १ हजार १ रुपये; किशोर गटासाठी १ हजार ५०१, १ हजार १ व ७०१ रुपये; तर बाल गटासाठी १ हजार १, ७०१ व ५०१ रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
समारोपप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरसे, प्राचार्या पद्मजा नेवे, अॅड. डॉ. महिमा मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला प्रा. सुशील महाजन व प्रा. प्रवीण महाजन यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक डॉ. महिमा मिश्रा यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. राजश्री पाठक यांनी केले.
मार्गदर्शन करताना डॉ. उल्हास पाटील यांनी, “संगीत ही केवळ कला नसून मनाला समृद्ध करणारी आणि समाजाला जोडणारी शक्ती आहे. भावगीतांच्या माध्यमातून मराठी संगीताची समृद्ध परंपरा आणि भावविश्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य गोदावरी करंडक स्पर्धेतून होत आहे,” असे सांगितले. गोदावरी संगीत महाविद्यालय भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देत राहील, असे त्यांनी नमूद केले.
परीक्षकांनी सहभागी सर्वच स्पर्धकांनी उत्तम तयारी करून भावगीते सादर केल्याचे सांगितले. गीतातील भाव, शब्दोच्चार, स्वरांची अचूकता, ताल आणि सादरीकरण यांचा चांगला समन्वय साधण्याचा प्रयत्न स्पर्धकांनी केला. निकाल हा स्पर्धेचा एक भाग असून सातत्याने रियाज व कलेची साधना करणे हेच कलाकारांच्या यशाचे खरे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र व्यवस्थापक श्री. राजू पाटील, प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. भूषण खैरनार, श्री. किशोर चौधरी, श्री. अनंता साठे, भूषण चौधरी यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते
बाल गट
- प्रथम : देवांशी जितेंद्र चौधरी — ‘केव्हा तरी पहाटे’
- द्वितीय : भैरवी दीपक ठाकूर — ‘फुलले रे क्षण माझे’
- तृतीय : कार्तिक संदीप ठाकूर — ‘तुझे गीत गाण्यासाठी’
- उत्तेजनार्थ : चारुल राजेंद्र वाघ — ‘मी वाऱ्याच्या वेगाने’
किशोर गट
- प्रथम : तनुष्का अनंत चौधरी — ‘मी फुले ही वेचतांना’
- द्वितीय : श्रावणी सचिन देशपांडे — ‘माझ्या सुरात माझा’
- तृतीय : दिव्या सुदाम शिवरामे — ‘सर्वस्वी तुजला वाहुनी’
- उत्तेजनार्थ : स्वरा विनायक विलायते — ‘मी मज हरपुन बसले’
प्रौढ गट
- प्रथम : नाजनीन शेख — ‘जिवलगा राहिले रे दूर’
- द्वितीय : प्रणव विनोद ईखे — ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’
- तृतीय : समीक्षा लक्ष्मीकांत माकोडे — ‘रसिका मी कैसे गाऊ गीत’
- उत्तेजनार्थ : निकिता गणेश जोशी — ‘जिवलगा कधी रे येशील तू’


कोणत्याही टिप्पण्या नाहीत