रेल्वे कॅन्टीन कर्मचाऱ्याचा खून; संशयित स्वतः एलसीबीसमोर हजर पाटील मळा परिसरात रात्री ९ वाजता खळबळ; संशयित अल्पवयीन असल्याची माहिती
रेल्वे कॅन्टीन कर्मचाऱ्याचा खून; संशयित स्वतः एलसीबीसमोर हजर
पाटील मळा परिसरात रात्री ९ वाजता खळबळ; संशयित अल्पवयीन असल्याची माहिती
भुसावळ, दि. ११ : शहरातील पाटील मळा परिसरातील आनंदराव कॉलनीत गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजता रेल्वे उपहारगृहातील कर्मचाऱ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. समतानगर, भुसावळ) असे मृताचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली. डीवायएसपी केदार बारबोले, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान तुषार सोनवणे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यांच्या डोक्याला व कपाळावर गंभीर दुखापत झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
नातलगाने फोडला हंबरडा
घटनेची माहिती मिळताच तुषार सोनवणे यांचे नातलग घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तुषार यांना पाहताच एका नातलगाने हंबरडा फोडला. दोषींना तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संशयित स्वतः एलसीबी कार्यालयात हजर
दरम्यान, या खून प्रकरणातील संशयित गुरुवारी रात्री जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात स्वतःहून हजर झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत