Contact Banner

‘संगीत के प्रणेता’ दोन दिवसीय संगीत समारोहात रसिक श्रोते मंत्रमुग्ध

 

sangeet-ke-praneta-two-day-music-festival-jalgaon

‘संगीत के प्रणेता’ दोन दिवसीय संगीत समारोहात रसिक श्रोते मंत्रमुग्ध

लेवाजगत न्यूज जळगाव : अभिजात भारतीय संगीत जनमानसात रुजविण्यासाठी मोलाचे योगदान देणारे संगीत महर्षी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयाच्या वतीने ‘संगीत के प्रणेता’ या दहाव्या दोन दिवसीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले. संगीत विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या समारोहात जिल्हाभरातील संगीत साधकांनी विविध कलाविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

विष्णुद्वयींच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन म्हणून प्रतिष्ठानच्या विविध शाळांसह जिल्ह्यातील संगीत साधकांनी स्वरसुमनांजली अर्पण केली. यावेळी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, वादन तसेच नृत्याचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पं. भातखंडे व पं. पलुस्कर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

विवेकानंद प्रतिष्ठानचे सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण सोहळे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन केले. पहिल्या दिवशी रंजना बाभुळके, तर दुसऱ्या दिवशी भूषण गुरव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व संगीत शिक्षकांनी ‘संगीत के प्रणेता शत-शत तुम्हे प्रणाम’ या गीतातून विष्णुद्वयींना स्वरभावांजली अर्पण केली.

पहिल्या दिवशी विवेकानंद प्रतिष्ठानच्या सेमी इंग्लिश विभाग, इंग्लिश मीडियम विभागासह मयूर शहा, जितेश मराठे, तेजस मराठे, नुपूर खटावकर, राहुल कासार, नुपूर चांदोरकर, शिवानी पाठक व रुचिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले.

दुसऱ्या दिवशी अक्षय गजभिये, स्वरा पाठक, सारंग जेऊरकर, योगेश पाटील, शिरीष जोशी, रमा करजगावकर, लक्ष्मण राजपूत, शानभाग विद्यालय, देवेंद्र गुरव, काशिनाथ पलोड स्कूल तसेच डॉ. अपर्णा भट यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस सादरीकरण केले.

विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, उपाध्यक्ष हेमाताई अमळकर, सचिव विनोद पाटील, सदस्य कविता दीक्षित, वैजयंती पाध्ये, वैशाली गोरे व दिनेश ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.

सुयोग गुरव व उमेश सूर्यवंशी यांनी आभार मानले. दर्शन गुजराती व कल्याणी वाणी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र भोईटे, शीतल सोनवणे, वर्षा कुलकर्णी, गणेश देसले, विवेक जोशी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.