Contact Banner

नगरसेविका सिमरन वानखेडे यांच्या निवेदनाची दखल; सावदा-हतनूर विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

 

savda-hatnur-ganesh-visarjan-marg-repair-simran-wankhede

नगरसेविका सिमरन वानखेडे यांच्या निवेदनाची दखल; सावदा-हतनूर विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

आमदार नंदकिशोर महाजन यांच्या निर्देशानंतर प्रशासनाची तातडीने कार्यवाही; काटेरी झुडपे हटविण्याचीही मागणी

लेवाजगत न्यूज सावदा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी सावदा ते हतनूर धरण या गणेश विसर्जन मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सावदा नगरपरिषदेच्या नगरसेविका सिमरन राजेश वानखेडे यांनी विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाची आमदार महाजन यांनी तत्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला निर्देश दिल्याने मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

सावदा शहरासह पंचक्रोशीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशमूर्ती विसर्जनासाठी सावदा ते हतनूर धरण हा प्रमुख मार्ग असल्याने गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर मोठी वर्दळ असते. मात्र, सध्या रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहनचालक तसेच पायी जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेविका सिमरन वानखेडे यांनी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी केली.

तसेच हतनूर धरण परिसरातील विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी व अनावश्यक झुडपे वाढली आहेत. त्यामुळे भाविकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होण्यासोबतच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही झुडपे हटवून रस्ता व परिसर स्वच्छ व मोकळा करावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली.

नगरसेविका सिमरन वानखेडे यांनी समस्या आमदार नंदकिशोर महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला कामाचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने विलंब न करता सावदा-हतनूर मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.

निवेदनानंतर तातडीने सुरू झालेल्या या कार्यवाहीमुळे गणेशभक्त आणि परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, उर्वरित रस्त्याची दुरुस्ती तसेच काटेरी झुडपे हटविण्याचे कामही लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.