Contact Banner

अपघातात फुफ्फुसांना गंभीर दुखापत झालेल्या २१ वर्षीय तरुणाचे प्राण वाचविण्यात यश

 

21-year-old-accident-patient-saved-dr-ulhas-patil-hospital

अपघातात फुफ्फुसांना गंभीर दुखापत झालेल्या २१ वर्षीय तरुणाचे प्राण वाचविण्यात यश

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या पथकाची यशस्वी कामगिरी




लेवाजगत न्यूज जळगाव : अपघातात गंभीर दुखापत झाल्याने दोन्ही फुफ्फुसांमध्ये रक्त व हवा साचलेल्या २१ वर्षीय तरुणाचे प्राण वाचविण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या पथकाला यश आले आहे. रुग्णाला श्वास घेण्यास मोठा त्रास होत असताना तातडीने करण्यात आलेल्या इंटरकॉस्टल ड्रेन (ICD) इन्सर्शन प्रक्रियेमुळे फुफ्फुसांवरील दाब कमी करण्यास मदत झाली. त्यानंतर कृत्रिम श्वसन, औषधोपचार आणि विशेष वैद्यकीय देखरेखीमुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील प्रबुद्ध नामक २१ वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागण्यासोबतच छातीला गंभीर दुखापत झाली होती. तसेच बरगड्यांना फ्रॅक्चर झाले होते. दोन्ही फुफ्फुसांमध्ये रक्त व हवा साचल्यामुळे फुफ्फुसांचा विस्तार कमी झाला होता. परिणामी, त्याला श्वास घेण्यास मोठा त्रास होत होता. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव फरके यांच्या पथकाने रुग्णाची तपासणी केली. छातीतील दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपचार सुरू करण्यात आले. दोन्ही फुफ्फुसांमध्ये रक्त व हवा साचल्याने श्वसनक्रियेवर गंभीर परिणाम झाला होता. त्यामुळे फुफ्फुसांवरील दाब कमी करून त्यांना पुन्हा विस्तारण्यास मदत करणे आवश्यक होते.

यानुसार रुग्णावर तातडीने आयसीडी इन्सर्शन प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेमुळे छातीमध्ये साचलेली हवा व रक्त बाहेर काढण्यास मदत झाली. प्रक्रियेनंतर रुग्णाला काही काळ कृत्रिम श्वसनाचा पुरवठा देण्यात आला. त्यासोबत आवश्यक औषधोपचार, सतत निरीक्षण आणि विशेष काळजी घेण्यात आली. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिल्याने त्याची श्वसनक्रिया हळूहळू सुधारू लागली.

या उपचार प्रक्रियेत डॉ. वैभव फरके यांना डॉ. शार्दुल कमले, डॉ. सुशांत जाधव, डॉ. दिशा राका, डॉ. रोहित बुक्का आणि डॉ. रोहित कोळी यांनी सहकार्य केले.

वेळेवर उपचारांमुळे रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य — डॉ. वैभव फरके

अपघातानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर होती. दोन्ही फुफ्फुसांमध्ये रक्त व हवा साचल्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत उपचारांना होणारा विलंब धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे रुग्णालयात दाखल होताच आवश्यक तपासण्या करून तातडीने आयसीडी इन्सर्शन करण्यात आले. त्यानंतर कृत्रिम श्वसनाचा पुरवठा, औषधोपचार आणि सतत निरीक्षणामुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. वेळेवर मिळालेले उपचार आणि वैद्यकीय पथकाने दाखविलेली तत्परता यामुळे रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य झाले, अशी माहिती डॉ. वैभव फरके यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.