रायफल शूटिंगमध्ये आदित्य सोनवणेचे सुवर्णयश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड ४०० पैकी ३९५.७ गुण मिळवत नाशिक विभागात प्रथम क्रमांक
रायफल शूटिंगमध्ये आदित्य सोनवणेचे सुवर्णयश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
४०० पैकी ३९५.७ गुण मिळवत नाशिक विभागात प्रथम क्रमांक
भुसावळ | प्रतिनिधी-
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी आदित्य राजेंद्र सोनवणे याने विभागीय आंतरशालेय रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. या यशासह त्याने नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळविला असून, आगामी राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
विभागीय स्तरावरील या स्पर्धेत आदित्यने ४०० पैकी तब्बल ३९५.७ गुण मिळवून आपल्या कौशल्याची आणि अचूक नेमबाजीची छाप पाडली. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत आदित्य सहभागी होणार असून, त्याच्या पुढील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
आदित्यच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल क्रीडा वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
आदित्यने मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही तो अशीच दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत