आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू भविष्यातील पाणीटंचाईचा विचार; १०० टक्के पाणीसाठा करण्याच्या सूचना
आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू
भविष्यातील पाणीटंचाईचा विचार; १०० टक्के पाणीसाठा करण्याच्या सूचना
यावल लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
शेळगाव बॅरेजमध्ये यंदा पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. आमदार अमोल जावळे यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देऊन भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करता शेळगाव बॅरेजमध्ये यावर्षी १०० टक्के पाणीसाठा करण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २, जळगाव यांच्याकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यानंतर मागील सुमारे पाच वर्षांत विविध कारणांमुळे त्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात आलेला नव्हता. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात उपसा सिंचनाचा लाभ मिळत नव्हता. तसेच बॅरेजमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याचा परिणाम परिसरातील भूजलपातळीवरही होत होता.
यंदा भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि शेळगाव बॅरेजमध्ये १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा करावा, अशी मागणी आमदार जावळे यांनी पत्राद्वारे केली होती. पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यास तापी नदीकाठच्या शेतकऱ्यांना उपसा सिंचनासाठी मोठा आधार मिळण्यासोबतच परिसरातील भूजल पुनर्भरणालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आजमितीस शेळगाव बॅरेज जलाशयाची पाणीपातळी १७७ मीटरवर पोहोचली आहे. आगामी काळात पाणीपातळीत आणखी एक ते दोन मीटरने वाढ होण्याची शक्यता असल्याने यंदा बॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यामुळे विस्तीर्ण जलाशयात पाणीसाठा झाल्यास त्याचा लाभ परिसरातील शेती, सिंचन तसेच भूजलपातळी वाढीस होण्याची अपेक्षा आहे.
आमदार अमोल जावळे यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाला दिलेल्या पत्रात याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
यामुळे यंदा शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याच्या हालचालींना वेग आला असून, तापी नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी हा पाणीसाठा सिंचन आणि भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत