गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथील १६ विद्यार्थ्यांची पुणे येथील किरण अकॅडमीमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रातील प्रगतीला आणखी एक नवी दिशा मिळाली असून महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संगणक शास्त्र अभियांत्रिकी विभागातील सहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातील सहा, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट आणि पायथॉन फुल स्टॅक डेव्हलपमेंट या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत प्रशिक्षण घेण्यासह प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजा समजून घेता येणार असून भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी महाविद्यालयात विविध प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमध्ये इंटर्नशिपच्या संधी मिळत असून त्यांच्या तांत्रिक ज्ञानाला व्यावहारिक अनुभवाची जोड मिळत आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. विजयकुमार वानखेडे, तसेच डॉ. अनिल विश्वकर्मा, डॉ. हेमंत इंगळे आणि डॉ. निलेश चौधरी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. निवड प्रक्रियेसाठी प्लेसमेंट विभागाच्या समन्वयक प्रा. रेश्मा अत्तरदे, प्रा. वेलचंद होले आणि प्रा. हेमराज धांडे यांनी सहकार्य केले.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) आणि डॉ. अनिकेत पाटील यांनीही विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक केले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि प्राध्यापकवृंदाने सर्व १६ विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत