जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची बाजी; तीन जागा बिनविरोध, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची बाजी; तीन जागा बिनविरोध, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने महत्त्वपूर्ण यश मिळवले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या एका जागेवर बिनविरोध निवड झाल्याने महायुतीने निवडणुकीत दमदार सुरुवात केली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. दुपारी तीन वाजेची मुदत संपल्यानंतर तीन मतदारसंघांतील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
यामध्ये पारोळा सोसायटी मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील, एरंडोल सोसायटी मतदारसंघातून मृणाल अमोल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच भुसावळ सोसायटी मतदारसंघातून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई संजय सावकारे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
या निकालामुळे जिल्हा बँकेतील तीन महत्त्वाच्या जागांवर महायुतीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री मृणाल पाटील यांची निवड झाल्याने राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई सावकारे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या राजकीय प्रभावाचीही चर्चा होत आहे.
तीन जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी जिल्हा बँकेच्या उर्वरित जागांसाठी चुरस कायम राहणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी, माघारी आणि त्यानंतरचे राजकीय डावपेच याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे माघारीनंतरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे अंतिम राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत