Contact Banner

मित्राच्या घरी प्लग बसवताना विजेचा धक्का; उबाठा शिवसेनेच्या विभागप्रमुखाचा मृत्यू पिंप्राळा परिसरात घटना; योगेश ऊर्फ भैय्या वाघ यांच्या निधनाने हळहळ

 


मित्राच्या घरी प्लग बसवताना विजेचा धक्का; उबाठा शिवसेनेच्या विभागप्रमुखाचा मृत्यू

पिंप्राळा परिसरात घटना; योगेश ऊर्फ भैय्या वाघ यांच्या निधनाने हळहळ

जळगाव : मित्राच्या घरी प्लग बसविण्याचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पिंप्राळा परिसरातील विभागप्रमुख योगेश ऊर्फ भैय्या वाघ (वय ४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भैय्या वाघ हे व्यवसायाने कुशल इलेक्ट्रिशियन होते. बुधवारी दुपारी ते पिंप्राळा परिसरातील मित्र सतीश आप्पा यांच्या घरी प्लग बसविण्याचे काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते खाली कोसळले.

घटनेनंतर मित्रांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली. नागरिकांनी त्यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात धाव घेतली.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ

योगेश ऊर्फ भैय्या वाघ हे शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला. मित्रपरिवारालाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

भैय्या वाघ यांच्या कुटुंबाने यापूर्वीही मोठ्या संकटाचा सामना केला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाला गंभीर अपघातात दुखापत झाली होती. त्या संकटातून कुटुंब सावरत असतानाच आता कुटुंबप्रमुखाच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पिंप्राळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.