डॉ.केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा ‘अनुभवांना द्या आवाज, खऱ्या कथांमधून घडवा बदल’; पोस्टर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ.केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा
‘अनुभवांना द्या आवाज, खऱ्या कथांमधून घडवा बदल’; पोस्टर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. १० : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे, मानसिक समस्यांबाबतचे गैरसमज दूर करणे आणि भावनिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मानसिक आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने अतिथी व्याख्यान आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘अनुभवांना द्या आवाज, खऱ्या कथांमधून घडवा बदल’ ही या उपक्रमाची मुख्य संकल्पना होती.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. हुमैद महाडिक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. हुमैद महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, भावनिक स्वास्थ्य जपण्याची गरज आणि मानसिक समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तींचे अनुभव संवेदनशीलतेने ऐकून घेणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना योग्य भावनिक आधार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज आणि कलंक दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तणाव व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी, भावनिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य जपण्याचे उपाय आणि निरोगी जीवनशैली अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सर्जनशील व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. अस्मिता जुमडे आणि प्रा. मंजिरी मडावी यांनी केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच मानसिक समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना आदर, सहकार्य आणि भावनिक आधार देण्याचा संदेश देण्यात आला. प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवाला महत्त्व देऊन तिचे म्हणणे सहानुभूतीने ऐकून घेणे, हा मानसिक आरोग्यविषयक सकारात्मक बदल घडविण्याचा महत्त्वाचा मार्ग असल्याचे कार्यक्रमातून स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी संवेदनशीलता वाढण्यास आणि समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजविण्यास मदत झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत