महादेव रुग्णालयात ‘गोल्डन अवर्स’मध्ये तरुणावर मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी
महादेव रुग्णालयात ‘गोल्डन अवर्स’मध्ये तरुणावर मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी
न्युरोसर्जन डॉ. अनिकेत उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया; रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा
लेवाजगत न्यूज जळगाव : अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूच्या आवरणाबाहेर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेल्या २७ वर्षीय तरुणावर जळगाव येथील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. अनिकेत उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया महादेव रुग्णालयातील पहिलीच मेंदूवरील शस्त्रक्रिया ठरली आहे.
रेलसिंग या २७ वर्षीय तरुणाला अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारासाठी महादेव रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉ. अनिकेत उल्हास पाटील यांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी केली. मेंदूच्या आवरणाबाहेर रक्त साचल्यामुळे मेंदूवर दाब वाढण्याची शक्यता असल्याचे निदान झाले. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेता वेळ न दवडता तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. अनिकेत पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अतुल जाधव, डॉ. श्रुती खंडागळे आणि डॉ. प्रितम दास यांच्या वैद्यकीय पथकाने ‘डिकॉम्प्रेसिव्ह क्रेनिओक्टोमी’ या पद्धतीने शस्त्रक्रिया केली. या प्रक्रियेदरम्यान कवटीचा आवश्यक भाग उघडून मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यात आला, तसेच साचलेले रक्त बाहेर काढण्यात आले.
अपघातानंतरच्या गंभीर परिस्थितीत उपचारासाठीचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने रुग्णाला तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात आले. वेळेत निदान करून योग्य उपचारपद्धतीचा अवलंब केल्यामुळे संभाव्य गुंतागुंत टाळण्यास मदत झाली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. महादेव रुग्णालयातील या शस्त्रक्रियेमुळे मेंदूविकार व गंभीर दुखापतींच्या उपचारांसाठी उपलब्ध वैद्यकीय सुविधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.
डॉ. अनिकेत पाटील म्हणाले…
“डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर मेंदूच्या आवरणाबाहेर रक्त साचल्यास मेंदूवर दाब वाढू शकतो. अशा परिस्थितीत रुग्णाचे तातडीने सीटी स्कॅन करून योग्य निदान करणे आणि गरज असल्यास वेळ न दवडता शस्त्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या रुग्णाच्या बाबतीत वेळेत निदान झाल्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे शक्य झाले,” असे न्युरोसर्जन डॉ. अनिकेत उल्हास पाटील यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत