Contact Banner

‘मोतीबिंदूमुक्त चोपडा तालुका’ अभियानाला प्रारंभ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ४ डिसेंबरपर्यंत गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

 

motibindumukt-chopda-taluka-abhiyan-netra-tapasani-shibir-2026

‘मोतीबिंदूमुक्त चोपडा तालुका’ अभियानाला प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ४ डिसेंबरपर्यंत गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

जळगाव, लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे ‘मोतीबिंदूमुक्त जळगाव जिल्हा’ अभियानांतर्गत आता ‘मोतीबिंदूमुक्त चोपडा तालुका’ या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. रावेर आणि यावल तालुक्यांतील यशस्वी अभियानानंतर चोपडा तालुक्यातील प्रत्येक गावात नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात येणार असून, ही मोहीम २६ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.





अभियानाच्या पहिल्या दिवशी २६ ऑक्टोबर रोजी धानोरा, मोहरद आणि बीडगाव येथे नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिन्ही गावांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शेकडो नागरिकांची नेत्रतपासणी केली.

या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नितू पाटील यांच्यासह डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावाड, डॉ. सृष्टी पाटील, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. अभिजीत काकड, डॉ. अनीष कांदळगावकर, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. रिया गोरे, डॉ. कीर्ती महाजन, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे, डॉ. ऋतुजा चव्हाण आणि डॉ. अश्विनी काकडे हे डॉक्टर रुग्णसेवेत योगदान देणार आहेत.

गावनिहाय नेत्रतपासणी शिबिरांचे वेळापत्रक

  • २६ ऑक्टोबर : धानोरा, मोहरद, बीडगाव
  • २८ ऑक्टोबर : अडावद, सुटकर, खुर्डी
  • ३० ऑक्टोबर : वड्री, मंगरूळा, वडली
  • २ नोव्हेंबर : विष्णापूर, अडगाव, विरवाडे
  • ४ नोव्हेंबर : नागलवाडी, वराड, गणापूर
  • १३ नोव्हेंबर : चांदसणी, कमलगाव, पंचक
  • १६ नोव्हेंबर : वैजापूर, देन्हारी, उमर्टी
  • १८ नोव्हेंबर : सत्रासेन, लासूर, चौगाव
  • २० नोव्हेंबर : अकुलखेडा, चहार्डी, हातेड
  • २३ नोव्हेंबर : बुधगाव, अनवर्दे, वाळसी
  • २७ नोव्हेंबर : कुसुंबा, वेळोदे, वनेदा
  • ३० नोव्हेंबर : खाचणे, कुरवेल, तावसे
  • २ डिसेंबर : निमगाव, वेले, गरनाड
  • ४ डिसेंबर : कलोबा, कठोरा, वटकर

मोतीबिंदूमुक्त तालुक्याचे उद्दिष्ट

रावेर आणि यावल तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘मोतीबिंदूमुक्त तालुका’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन्ही तालुक्यांमध्ये हजारो नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली, तर गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याच यशस्वी अनुभवातून प्रेरणा घेत चोपडा तालुकाही मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही दृष्टीच्या उपचारांपासून वंचित राहावे लागू नये आणि मोतीबिंदूमुळे कोणाचेही जीवन अंधारमय होऊ नये, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नितू पाटील यांनी सांगितले.

चोपडा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानांतर्गत आयोजित शिबिरांमध्ये सहभागी होऊन नेत्रतपासणी करून घ्यावी. तसेच गरजू रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.