पीक विम्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे; आमदार अमोल जावळे यांच्या सूचना ३१ ऑक्टोबर अर्जाची अंतिम मुदत; पात्र शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळवून देण्याचे आवाहन
पीक विम्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे; आमदार अमोल जावळे यांच्या सूचना
३१ ऑक्टोबर अर्जाची अंतिम मुदत; पात्र शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळवून देण्याचे आवाहन
प्रतिनिधी | लेवाजगत न्यूज
पीक विमा अर्ज भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असल्याने मतदारसंघातील एकही पात्र शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून काम करावे, अशा सूचना आमदार अमोलभाऊ जावळे यांनी दिल्या. पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आयोजित ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला आमदार अमोलभाऊ जावळे, आमदार नंदूभाऊ महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, प्रांताधिकारी बबन काकडे, यावल, रावेर व मुक्ताईनगरचे तहसीलदार, यावल व रावेरचे तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सहकारी बँकांचे प्रतिनिधी आणि सीएससी केंद्रांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
बैठकीत पीक विमा अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि निर्धारित वेळेत अर्ज पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अंतिम मुदत जवळ आल्याने संबंधित यंत्रणांनी कामाला गती देण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
डिजिटल पीक पाहणी अपूर्ण असली तरी अर्जासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन
ज्या शेतकऱ्यांची डिजिटल पीक पाहणी अद्याप ऑनलाइन पूर्ण झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी घोषणापत्राच्या आधारे ३१ ऑक्टोबरपर्यंत पीक विमा अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले. अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
बँक किंवा सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज संबंधित बँका आणि संस्थांनी भरून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर अर्ज भरावेत. अर्ज भरताना तांत्रिक अडचणी उद्भवल्यास ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
डिजिटल पीक पाहणीसाठी १० नोव्हेंबरची मुदत
पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असून, डिजिटल पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंतची मुदत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या दोन्ही स्वतंत्र प्रक्रिया असल्याने शेतकऱ्यांनी पीक विम्याचा अर्ज भरल्यानंतर डिजिटल पीक पाहणीची प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करावी.
या कामासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षक यांनी गावोगावी जाऊन समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार अमोल जावळे यांनी दिले.
पात्र शेतकरी विम्यापासून वंचित राहू नयेत
पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग, बँका, सहकारी संस्था आणि सीएससी केंद्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून पात्र शेतकऱ्यांचे अर्ज मुदतीत पूर्ण होतील, यासाठी सर्व यंत्रणांनी तत्परतेने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत