रस्ते अपघातातील तरुणाच्या मेंदूवरील गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश
रस्ते अपघातातील तरुणाच्या मेंदूवरील गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश
लेवाजगत न्यूज जळगाव : खरगाव येथील लंगडा अंबा परिसरातील २४ वर्षीय तरुणाच्या मेंदूला रस्ते अपघातात झालेल्या गंभीर दुखापतीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांची तत्परता आणि वेळेत मिळालेले उपचार यामुळे तरुणाचे प्राण वाचविण्यात यश आले.
लंगडा अंबा परिसरातील दयाराम बरेला (वय २४) हे रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते.
मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी तातडीने रुग्णाची तपासणी करून उपचार सुरू केले. एनसीसीटी ब्रेन तपासणीमध्ये डोक्याच्या डाव्या कपाळाच्या भागात डिप्रेस्ड स्कल फ्रॅक्चर म्हणजे कवटीचे हाड तुटून आतल्या बाजूला दाबले गेल्याचे आढळून आले. तसेच फ्रॅक्चरच्या खालील भागात मेंदूच्या ऊतींना दुखापत झाल्याचे निदान झाले.
रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असल्याने आणि मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाला पुढील गुंतागुंत होऊ नये तसेच मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यासाठी त्याच दिवशी डिकम्प्रेसिव्ह क्रॅनिएक्टॉमी विथ इव्हॅक्युएशन ऑफ हेमॅटोमा ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूवरील दाब कमी करण्यासोबतच साचलेले रक्त बाहेर काढण्यात आले.
गंभीर अवस्थेतील रुग्णावर वेळ न दवडता तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. शस्त्रक्रियेनंतरच्या काळात कोणतीही मोठी गुंतागुंत झाली नाही. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला असून सुरुवातीला बेशुद्ध असलेल्या दयाराम बरेला यांच्या प्रकृतीत आता समाधानकारक सुधारणा होत आहे.
या शस्त्रक्रियेसाठी डॉ. विपूल राठोड यांना डॉ. प्रितम दास व त्यांच्या टीमने सहकार्य केले. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली.
कोट :
“रस्ते अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर तज्ज्ञ वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. बेशुद्धावस्था, डोक्याला गंभीर मार, उलट्या, झटके किंवा प्रतिसाद न देणे अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. दयाराम बरेला यांच्या प्रकरणात वेळेत रुग्णालयात दाखल करून आवश्यक तपासण्या व तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे.”
— डॉ. प्रितम दास, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय


कोणत्याही टिप्पण्या नाहीत