सर्चलाईट स्कूलमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या प्रकल्प प्रदर्शनाला प्रतिसाद
सर्चलाईट स्कूलमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रकल्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; माया तायडे यांचा संस्कारक्षम शिक्षणावर भर
लेवाजगत न्यूज सावदा : वढोदे प्र. सावदा येथील सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेले शैक्षणिक प्रकल्प, भाषणे, धम्मगीते आणि सामूहिक गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळी, फलकलेखन आणि सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध शैक्षणिक प्रकल्पांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. या प्रदर्शनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन रावेर नगरपालिकेचे नगरसेवक नरेंद्र ऊर्फ पिंटू वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते दिलीप कांबळे होते, तर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माया तायडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
बालवयातील संस्कारांतून विवेकशील नागरिक घडतात : माया तायडे
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माया तायडे यांनी बालवयातच योग्य संस्कार रुजविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमध्ये समता, विवेकशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केल्यास ते अंधश्रद्धेपासून दूर राहून जबाबदार नागरिक बनू शकतात, असे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षणासोबतच महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची रुजवणूक करणाऱ्या शाळेच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : दिलीप कांबळे
अध्यक्षीय भाषणात कामगार नेते दिलीप कांबळे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक आणि वैचारिक महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक विकास न करता त्यांच्यामध्ये चारित्र्य, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे यांनी प्रास्ताविकातून शाळेची ध्येयधोरणे आणि कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांमध्ये समतेची भावना, संविधानिक मूल्यांचा आदर आणि महापुरुषांच्या विचारांप्रती बांधिलकी निर्माण करण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. योगेश तायडे यांनीही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मार्गदर्शन केले.
यावेळी दिपाली भालेराव, पंकज भालेराव, रंजना गजरे आणि शिवांगी भालेराव यांनी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांना आणि धम्मगीतांना उपस्थितांनी दाद दिली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे, सावदा येथील नगरसेवक विशाल तायडे, वडोदा गट ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील बोदडे, सामाजिक कार्यकर्ते पप्पू मेढे, रॉकी साबळे, सुनील शिरतुरे, योगेश मेढे आणि अमोल चक्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव मेश्राम आणि पूनम तायडे यांनी केले, तर मुख्याध्यापक विजय भालेराव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता बैसाणे, नम्रता लहासे, भारती वाघ, मनीषा पवार, विक्रम तायडे, जयदीप मेढे, सुनील बाऱ्हे आणि किरण लहासे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांचे विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक मूल्यांची जाणीव रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत