Contact Banner

सातबारा नोंदणीसाठी एक लाखांची लाच; मंडळ अधिकारी, तलाठी व मदतनीस एसीबीच्या ताब्यात

 

uran-satbara-registration-bribe-acb-arrests-revenue-officer-talathi

सातबारा नोंदणीसाठी एक लाखांची लाच; मंडळ अधिकारी, तलाठी व मदतनीस एसीबीच्या ताब्यात


uran-satbara-registration-bribe-acb-arrests-revenue-officer-talathi


उरण : लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सुनील ठाकूर-

सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना उरण महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी आणि एका खासगी मदतनीसाला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतल्याची घटना मंगळवारी (५ ऑक्टोबर) उरण तालुक्यातील कोप्रोली येथे घडली. या कारवाईमुळे महसूल विभागातील कथित लाचखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी केशव मोहिते यांनी सुरुवातीला दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोडीअंती एक लाख रुपयांवर व्यवहार निश्चित झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

याप्रकरणी तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुंधती येवले यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने कोप्रोली परिसरात सापळा रचला.

सापळ्यादरम्यान एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी केशव मोहिते, चिरनेर येथील तलाठी जयहिंद कोळी आणि खासगी मदतनीस मोनिका पाटील यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.

या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीच्या पोलीस निरीक्षक अरुंधती येवले यांनी दिली.

उरणच्या पूर्व भागात सध्या मोठ्या प्रमाणात जमीन व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांची मोठी ये-जा असते. अशा पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल तक्रारदाराचे परिसरातून कौतुक होत आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास नागरिकांनी संबंधित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन या प्रकरणाच्या निमित्ताने करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.