पाडव्याच्या गर्दीत तुळजापुरात आगीचा थरार! डोंगरावर आगीचा भडका; अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला.
पाडव्याच्या दिवशी पाडव्याच्या गर्दीत तुळजापुरात आगीचा थरार! डोंगरावर आगीचा भडका; अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला.
तुळजापूर : पाडव्याच्या सणानिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झालेली असतानाच तुळजापूर शहरातील बिडकर तलाव परिसरातील डोंगरावर आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागल्याने मंदिर परिसरात उपस्थित भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पाडव्याच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्रासह विविध राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर भाविकांची मोठी वर्दळ असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सतत ये-जा सुरू आहे. अशातच मंदिर परिसराच्या जवळील बिडकर तलाव भागातील डोंगरावर आग लागल्याने भाविकांचे लक्ष घटनास्थळाकडे वेधले गेले.
सुरुवातीला लहान स्वरूपात असलेली आग काही वेळातच वाढत गेली. डोंगरावरील वाळलेली झाडे, झुडपे आणि परिसरात पडलेला कचरा यामुळे आगीने अधिक पेट घेतला. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट दूरवरून दिसू लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही भाविकांनी खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग अधिक पसरू नये आणि संभाव्य धोका टाळता यावा, यासाठी जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मंदिर परिसरातील संभाव्य मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार फटाक्यांमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याबाबत अधिक माहिती आणि तपासानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे.
२४ तासांत दुसऱ्यांदा आगीची घटना
विशेष म्हणजे, तुळजापूर शहरात गेल्या २४ तासांत आगीची ही दुसरी घटना असल्याचे समोर आले आहे. सणासुदीच्या काळात मंदिर परिसरात हजारो भाविकांची गर्दी होत असताना अशा घटना घडणे चिंतेचा विषय ठरत आहे. डोंगर परिसरातील वाळलेली झाडे, झुडपे आणि साचलेला कचरा यांची नियमित विल्हेवाट लावणे, तसेच अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाने मंदिर परिसरासह गर्दीच्या ठिकाणी विशेष खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत