आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सुशिक्षित नागरिक व युवकांनी पुढाकार घ्यावा
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सुशिक्षित नागरिक व युवकांनी पुढाकार घ्यावा
जळगाव, दि. १५ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवीत आहे. मात्र, या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी केवळ शासन आणि प्रशासनावर अवलंबून न राहता समाजातील सुशिक्षित नागरिक व युवकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. भौतिक सुविधांसोबतच वैचारिक प्रगल्भता महत्त्वाची असून, समाजाच्या विकासासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित 'जनजातीय गौरव दिना'च्या कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या की, केवळ रस्ते, पूल यांसारख्या भौतिक सुविधांचा विकास म्हणजे समाजाचा सर्वांगीण विकास नव्हे, तर त्यासोबत वैचारिक प्रगल्भताही तितकीच महत्त्वाची आहे. शासकीय यंत्रणेसोबतच नागरिकांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून एकत्रितपणे काम केल्यास क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे स्वप्न साकार होण्यास निश्चितच मदत होईल.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी दिलेला लढा, त्यांचे क्रांतिकारी कार्य आणि सर्वोच्च बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक असून, त्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळेल, असेही मंत्री महाजन यांनी नमूद केले.
खासदार स्मिता वाघ यांनी आदिवासी समाजाच्या प्रामाणिकपणाचा गौरव करताना, आदिवासी समाज हा शब्दाला जागणारा समाज असल्याचे सांगितले. भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमीन या हक्कांच्या रक्षणासाठी ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले. आदिवासी संस्कृती, नृत्य आणि परंपरांचे जतन करून हा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
चित्रमय जीवनपट व योजनांचे प्रदर्शन
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती कार्यालयाच्या परिसरात भगवान बिरसा मुंडा यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रमय फलक आणि आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आला होता. तसेच आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गटाला १० हजार रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
जळगाव शहरातून भव्य रॅली
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जी.एस. ग्राउंड येथून सुरू झालेली रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेतील आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी आमदार सुरेश भोळे, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी रमेश धापके, तहसीलदार शितल राजपूत यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत