Contact Banner

फैजपूरच्या विकासाला मिळणार ३५ कोटींची गती! १८ नोव्हेंबरला विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा; रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, रिक्रिएशन सेंटर व जलतरण तलावासह नागरी सुविधांचा विकास

 

faizpur-35-crore-development-works-bhumipujan-18-november-2026

फैजपूरच्या विकासाला मिळणार ३५ कोटींची गती!

१८ नोव्हेंबरला विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा; रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, रिक्रिएशन सेंटर व जलतरण तलावासह नागरी सुविधांचा विकास




फैजपूर (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : फैजपूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, शहरात सुमारे ३५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा १८ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे व आमदार नंदूभाऊ महाजन यांच्या सहकार्याने, यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या प्रयत्नांना फैजपूरच्या नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची साथ मिळाली आहे.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करणे, पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, मनोरंजन आणि आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये सर्व नगरसेवक, आजी-माजी नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचेही सहकार्य लाभत आहे.

रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठी निधी

शहरातील रस्त्यांचे खडीकरण, काँक्रिटीकरण, डांबरीकरण व गटार बांधकामासाठी २ कोटी ५९ लाख रुपये, नगरोत्थान योजनेंतर्गत भुसावळ रस्त्याच्या डांबरीकरण व काँक्रिटीकरणासाठी ३ कोटी ४० लाख रुपये, तर स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधकामासाठी १ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

फैजपूर शहरांतर्गत रस्ते मजबुतीकरण व खडीकरणासाठी १ कोटी रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणासाठी १ कोटी ९५ लाख रुपये, म्युनिसिपल हायस्कूलच्या सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी १ कोटी रुपये आणि नमो उद्यान निर्मितीसाठी १ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.

अभ्यासिका, रिक्रिएशन सेंटर आणि पाणीपुरवठ्याला प्राधान्य

वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत अभ्यासिका व सामाजिक सभागृहासाठी १ कोटी २८ लाख रुपये, नगरपालिकेच्या जागेवर रिक्रिएशन सेंटर उभारण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये, तर पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्यासाठी पाइपलाइन, बोअरवेल, फिल्टर टाकी दुरुस्ती व लोखंडी चेंबर प्लेट बसविण्यासाठी १ कोटी १३ लाख रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प महत्त्वाचा

शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापनासाठी ३ कोटी ८४ लाख रुपये, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १४ कोटी ४७ लाख ७६ हजार रुपये, तसेच फैजपूर शहर सुशोभीकरण व घाडी नदी पुलाच्या सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. या प्रकल्पांमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला चालना मिळण्यासह पर्यावरण संरक्षणालाही मदत होणार आहे.

गिरीशभाऊ महाजन यांचे मार्गदर्शन, आमदार अमोलदादा जावळे यांचे प्रयत्न; नगराध्यक्ष दामिनी सराफ यांचा पाठपुरावा

शहराच्या विकासासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून विकासकामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे मार्गदर्शन, आमदार अमोलदादा जावळे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांचा पाठपुरावा यामुळे फैजपूर शहरातील विविध विकासकामांना गती मिळत आहे. यासाठी सर्व नगरसेवक, आजी-माजी नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.

रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण, उद्याने, सामाजिक सभागृह, मनोरंजनाच्या सुविधा आणि आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांतील कामांमुळे फैजपूर शहराच्या नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याने शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार असून, फैजपूरकरांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

होय... फैजपूर बदलत आहे! विकासाच्या नव्या दिशेने फैजपूरची वाटचाल सुरू होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.