दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह उजळले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद!
दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह उजळले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद!
जळगाव (प्रतिनिधी) : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा उत्सव. याच आनंदाची अनुभूती जळगाव येथील मुलांचे बालगृह व निरीक्षण गृहातील मुलांना अनुभवता यावी, या उद्देशाने दीपावलीनिमित्त एका सुरेल संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस दलातील नामवंत कलाकार संघपाल तायडे यांच्या ‘स्वरश्री पथका’तर्फे आयोजित या सांगीतिक कार्यक्रमाने बालगृहातील मुलांची दिवाळी अविस्मरणीय केली.
स्थानिक जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेद्वारे संचलित मुलांचे बालगृह व निरीक्षण गृहाचा परिसर दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई आणि लख्ख दिव्यांनी उजळून निघाला होता. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बालगृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव यांच्या हस्ते उपस्थित कलाकारांचे गुलाबपुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
सुरेल गीतांनी मुलांची जिंकली मने
या संगीत मैफिलीत प्रसिद्ध गायक संघपाल तायडे, मकरंद चौधरी, गायिका वर्षा चौधरी, विद्या भंगाळे, अजित भालेराव आणि प्रकाश सोनवणे यांनी आपल्या सुमधुर आवाजातून विविध गीतांची सुरेल मेजवानी सादर केली. दिवाळी गीते, भक्तिगीते, भावगीते, देशभक्तिपर गीते तसेच लोकप्रिय मराठी आणि हिंदी गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कलाकारांच्या सादरीकरणाला बालगृहातील मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गाण्यांच्या तालावर आणि सुरांवर मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या कार्यक्रमाचे खरे यश ठरले. संगीताच्या माध्यमातून मुलांच्या मनात आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेची भावना निर्माण झाली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व कलावंत निवेदक यांनी उपस्थित मुला-मुलींना तसेच कर्मचाऱ्यांना दीपावली या पवित्र सणाचे महत्त्व समजावून सांगितले. जीवन जगताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, संकटांवर मात करण्याची जिद्द बाळगावी आणि आयुष्यात आशावादी राहावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे नेटके, सुंदर आणि भावस्पर्शी सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले. त्यांच्या शैलीदार निवेदनामुळे कार्यक्रमात अधिक रंगत निर्माण झाली.
‘स्वरश्री पथका’ने सामाजिक बांधिलकी जपत बालगृहातील मुलांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतला. या उपक्रमामुळे मुलांची यंदाची दिवाळी अधिक आनंददायी आणि संस्मरणीय ठरली. संगीताच्या माध्यमातून बालमनात आनंदाचे रंग भरणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अधीक्षक रविकिरण अहिरराव यांनी उपस्थित कलाकारांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत