Contact Banner

कार्तिक पौर्णिमेला अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांचा महासागर! दोन दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांनी घेतले भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन; दोन तासांत ३३ अभिषेक, दोन किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी रांगा

 

jalgaon-kartik-purnima-ayappa-temple-50000-devotees-kartik-swami-darshan

कार्तिक पौर्णिमेला अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांचा महासागर!

दोन दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांनी घेतले भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन; दोन तासांत ३३ अभिषेक, दोन किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी रांगा

जळगाव (प्रतिनिधी) : कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राच्या पवित्र पर्वानिमित्त जळगाव शहरातील निवृत्तीनगर येथील केरळी महिला ट्रस्टच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांचा अभूतपूर्व जनसागर लोटला. भगवान कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता मंदिराचे द्वार दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर सुरू झालेला दर्शनाचा ओघ २४ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजेपर्यंत कायम होता. या दोन दिवसांत तब्बल ५० हजारांहून अधिक भाविकांनी भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

यंदा कृत्तिका नक्षत्राचा कालावधी अधिक असल्याने दर्शनासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. मंदिराचे द्वार उघडताच दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली. मंदिर परिसरापासून जवळपास दोन किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा पोहोचल्या होत्या. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

दोन तासांत ३३ अभिषेकांचा धार्मिक सोहळा

मंदिराचे द्वार खुले झाल्यानंतर रात्री ९.३० ते ११.३० या अवघ्या दोन तासांच्या कालावधीत ३३ अभिषेक विधी पार पडले. मंदिराच्या अध्यक्षा श्रीमती वासंती अय्यर आणि पुजारी कृष्णमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमूर्ती पाठक गुरुजी गोविंद तिवारी यांनी मंत्रोच्चारात पूजाविधीला प्रारंभ केला. धार्मिक विधींच्या वेळी केरळी महिला ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते.

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने दिवसभरात अनेक मान्यवरांनी मंदिरात उपस्थित राहून भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. यामध्ये स्थानिक नगरसेवक, अतुल जैन, सीतारामदादा सोनवणे यांच्यासह आजी-माजी आमदार व खासदारांचा समावेश होता.

नवसपूर्तीसाठी भाविकांची मांदियाळी

भगवान कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी अनेक भाविक नवस फेडण्यासाठी आले होते. मंदिरासमोर अभिषेकासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना धार्मिक मार्गदर्शनही करण्यात येत होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या कपाळावर टिळा लावून चण्याचा प्रसाद देण्यात येत होता. भगवान कार्तिक स्वामींच्या दर्शनाने मनाला शांती, समाधान, सकारात्मक ऊर्जा आणि नवी शक्ती मिळते, अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.

केरळी महिला ट्रस्टचे नियोजन

भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता दर्शन आणि पूजाविधी सुरळीत पार पडण्यासाठी केरळी महिला ट्रस्टच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. रात्री १२.३० वाजता मंदिराचे द्वार बंद करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक उत्साहाचा अनोखा संगम ठरलेल्या या सोहळ्याने जळगावकरांच्या मनात भक्तिमय वातावरण निर्माण केले. कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात झालेली भाविकांची ही अभूतपूर्व गर्दी शहरातील धार्मिक उत्सवांमध्ये विशेष लक्षवेधी ठरली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.