Contact Banner

पावना लेक येथे रायगड तायक्वांडो असोसिएशनचे भव्य दिवाळी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न! १७७ विद्यार्थ्यांचा सहभाग; ७५ टक्के मुलींची उपस्थिती ठरले शिबिराचे खास वैशिष्ट्य

 

raigad-taekwondo-association-diwali-training-camp-pawna-lake-lonavala-177-students

पावना लेक येथे रायगड तायक्वांडो असोसिएशनचे भव्य दिवाळी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न!

१७७ विद्यार्थ्यांचा सहभाग; ७५ टक्के मुलींची उपस्थिती ठरले शिबिराचे खास वैशिष्ट्य

उरण (सुनील ठाकूर) : हकुना मटाटा पूल साईड, पावना लेक, लोणावळा येथे रायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने आयोजित भव्य दिवाळी व्हॅकेशन तायक्वांडो प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जवळपास १७७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना दररोज तब्बल आठ तासांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण देण्यात आले. तायक्वांडोमधील विविध तंत्रे, शारीरिक क्षमता, शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षण, फिटनेस आणि स्पर्धात्मक कौशल्यांचा विकास यावर विशेष भर देण्यात आला. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते मोठ्या वयोगटातील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी या शिबिरात सहभाग घेतला.

७५ टक्के मुलींचा सहभाग; पालकांच्या विश्वासाचे प्रतीक!

या शिबिरातील सर्वात अभिमानास्पद बाब म्हणजे जवळपास ७५ टक्के मुलींचा सहभाग होता. आजच्या काळात मुलींना घरापासून दूर प्रशिक्षणासाठी पाठवताना पालक त्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेतात. मात्र, पालकांनी प्रशिक्षकांवर आणि त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीवर दाखवलेला विश्वास या मोठ्या महिला सहभागातून स्पष्टपणे दिसून आला. पालकांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आयोजकांनी सर्व पालकांचे मनःपूर्वक आभार मानले.

या शिबिरात दोन NS Diploma कोर्स पूर्ण केलेले प्रशिक्षक प्राजक्ता अंकोलेकर आणि शुभम पोवार यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच प्रमुख प्रशिक्षक म्हणून सुभाष पाटील आणि अनिल म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यांच्यासोबत संतोष पालेकर, अक्षय पवार, सुनील म्हात्रे, दिनेश म्हात्रे, जय पाटील, सेजल कानेकर, अक्षता भगत, साहिल पालेकर आणि ओंकार भगत यांनीही प्रशिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले.

१७७ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, दररोज आठ तासांचे प्रशिक्षण, मुलींची लक्षणीय उपस्थिती आणि प्रशिक्षकांचे समर्पित योगदान यामुळे हे शिबिर यशस्वी आणि संस्मरणीय ठरले.

विद्यार्थ्यांना केवळ तायक्वांडोचे प्रशिक्षण देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची क्षमता आणि आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्याची जिद्द निर्माण करणे हा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणारे सर्व प्रशिक्षक, सहभागी विद्यार्थी आणि विशेषतः विश्वासाने आपल्या पाल्यांना शिबिरात पाठवणारे सर्व पालक यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.