Contact Banner

पिंपरी-चिंचवड येथे समता भ्रातृ मंडळाचा भव्य आंतरराष्ट्रीय वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न! सुमारे ८०० समाजबांधवांची उपस्थिती; मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग

 

samata-bhratru-mandal-international-bride-groom-meet-pimpri-chinchwad-800-attendees

पिंपरी-चिंचवड येथे समता भ्रातृ मंडळाचा भव्य आंतरराष्ट्रीय वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न!

सुमारे ८०० समाजबांधवांची उपस्थिती; मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी-चिंचवड : लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समता भ्रातृ मंडळ, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आयोजित भव्य-दिव्य आंतरराष्ट्रीय वधू-वर मेळावा रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी निगडी येथील गणेश तलावाजवळील पाटीदार भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याला जवळपास ८०० समाजबांधवांनी उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. पल्लवी तानसेन चौधरी, सौ. संगीता विलास बरोले, डॉ. सागर राणे, श्री. किरण प्रभाकर पाटील, श्री. नामदेवदादा ढाके, श्री. प्रफुल्ल सुधाकर बढे तसेच गोदावरी फाउंडेशनचे डॉ. वैभव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष श्री. हेमंत श्रीरंग झोपे होते.

लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर आणून विवाह जुळवणीची प्रक्रिया सुलभ करणे, समाजातील कुटुंबांमध्ये परस्पर संवाद वाढविणे आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ करणे, हा या मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता.

या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष उपस्थितीबरोबरच ऑनलाइन पद्धतीनेही सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मंडळाच्या www.samatabhratr mandal.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच हॉलवरतीही उपस्थित राहून सहभाग नोंदविण्याची सुविधा देण्यात आली होती. विवाहेच्छुक युवक-युवतींची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी रंगीत वधू-वर सूचिका हार्ड कॉपी स्वरूपातही उपलब्ध करून देण्यात आली होती.

मेळाव्यात विवाहेच्छुक युवक-युवतींच्या कुटुंबीयांना एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधता यावा, अपेक्षा जाणून घेता याव्यात आणि विवाह जुळवणीसंदर्भात सकारात्मक चर्चा करता यावी, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे उपस्थित पालक आणि समाजबांधवांना या उपक्रमाचा लाभ घेता आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समता भ्रातृ मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी अशा प्रकारचे मेळावे काळाची गरज असून, समाजाला एकत्र आणण्याबरोबरच नवीन नाती जोडण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरतात, असे मत व्यक्त करण्यात आले.

मेळाव्याच्या यशस्वितेसाठी पदाधिकारी व सदस्यांचे विशेष परिश्रम

या भव्य मेळाव्याच्या यशस्वितेसाठी समता भ्रातृ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. भागवत त्र्यंबक चौधरी, अध्यक्ष श्री. हेमंत श्रीरंग झोपे, कार्याध्यक्ष श्री. तिताराम गणपत ताणे, उपाध्यक्ष श्री. दिगंबर पंढरीनाथ महाजन, उपाध्यक्ष सौ. डॉ. रेखा मोहन भोळे, सचिव श्री. रविंद्र नामदेव बहाटे, सहसचिव श्री. सचिन खेमचंद चौधरी, खजिनदार श्री. नितेश पुंजा फेगडे, सहखजिनदार श्री. नितीन सुभाष पाटील, प्रसिद्धीप्रमुख श्री. नरेंद्र लालजी पाटील, प्रसिद्धीप्रमुख श्री. मनोज टिकाबराम इंगळे, वधू-वर मेळावा व्यवस्थापक श्री. रघुनाथ शंकर फेगडे, सहाय्यक व्यवस्थापक सौ. गौरी एकनाथ सरोदे, तसेच श्री. दिगंबर लक्ष्मण बढे, श्री. हेमंत सुधाम भोळे, श्री. योगेश भास्कर वायकोळे यांच्यासह मंडळाच्या सर्व विश्वस्त, पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

याशिवाय समाजातील श्री. विलास बरोले, श्री. शिवाजी साकोळकर, श्री. नितीन बोंडे, डॉ. पवन भोळे, श्री. अनिल परतोळे, श्री. निखिल राणे व इतर समाजबांधवांनीही मोलाचे सहकार्य केले.

सर्व पदाधिकारी, विश्वस्त, सदस्य आणि समाजबांधवांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा आंतरराष्ट्रीय वधू-वर मेळावा सुमारे ८०० जणांच्या उपस्थितीत उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला. या उपक्रमामुळे लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले असून, समाजाच्या एकजुटीचेही दर्शन घडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.