Contact Banner

प्रशिक्षकाअभावी पदक हुकले, पण जिद्द कायम! उरणच्या जलकन्या प्रियांशी पाटीलची युथ ऑलिम्पिकमध्ये सहाव्या स्थानी झेप अवघ्या १४ व्या वर्षी जागतिक स्तरावर चमक; डकार २०२६ स्पर्धेत टॉप-१० मध्ये स्थान मिळवत भारताचा नावलौकिक

 

uran-jalkanya-priyanshi-patil-youth-olympics-dakar-2026-sixth-rank

प्रशिक्षकाअभावी पदक हुकले, पण जिद्द कायम! उरणच्या जलकन्या प्रियांशी पाटीलची युथ ऑलिम्पिकमध्ये सहाव्या स्थानी झेप

अवघ्या १४ व्या वर्षी जागतिक स्तरावर चमक; डकार २०२६ स्पर्धेत टॉप-१० मध्ये स्थान मिळवत भारताचा नावलौकिक


uran-jalkanya-priyanshi-patil-youth-olympics-dakar-2026-sixth-rank


उरण, प्रतिनिधी : सुमिल ठाकूर

अवघ्या १४ व्या वर्षी जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या उरणच्या जलकन्या प्रियांशी पाटील हिने डकार २०२६ युथ ऑलिम्पिक गेम्समध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विंडसर्फिंग या साहसी जलक्रीडा प्रकारात तिने जागतिक स्तरावर सहावे स्थान पटकावत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तिसरे स्थान मिळवत तिने पदकाच्या आशा निर्माण केल्या होत्या. मात्र, अनुभवी प्रशिक्षकाच्या अभावामुळे पदकापासून तिला दूर राहावे लागले. तरीही प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता तिने केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.

डकार येथे झालेल्या या स्पर्धेत प्रियांशी ही भारतातील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक होती. पहिल्याच दिवशी तिने आपल्या कौशल्याची चमक दाखवत तिसरे स्थान मिळवले. मात्र, पुढील शर्यतींमध्ये बदलत्या हवामानानुसार रणनीती आखणे आणि तांत्रिक चुका सुधारण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षकाचे मार्गदर्शन तिला मिळू शकले नाही. इतर देशांच्या खेळाडूंसोबत अनुभवी प्रशिक्षकांची टीम असताना प्रियांशीला स्वतःचा प्रशिक्षक उपलब्ध नव्हता. वाऱ्याचा वेग अचानक वाढणे आणि कमी होणे अशा आव्हानात्मक परिस्थितीतही तिने आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा सुरू ठेवली आणि सहावे स्थान मिळवले.

या स्पर्धेत इटलीच्या लॉरा ग्रासो कास्टाग्नेटा हिने सुवर्णपदक, स्पेनच्या ओलिविया सांचेज हिने रौप्यपदक, तर चीनच्या वू झियान हिने कांस्यपदक पटकावले.

प्रियांशीचा विंडसर्फिंगमधील प्रवासही प्रेरणादायी आहे. डिसेंबर २०२४ मध्ये तिने या खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला समुद्राचे पाणी आणि खडक यांची भीती वाटत असतानाही भावाच्या प्रोत्साहनामुळे तिने समुद्रात पहिले पाऊल टाकले. त्यानंतर या खेळाची आवड निर्माण झाली आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर अवघ्या दोन वर्षांत तिने जागतिक स्तरावर मजल मारली.

प्रियांशीच्या यशामागे तिच्या वडिलांचेही मोठे योगदान आहे. भारतीय नौदलात कार्यरत असलेले तिचे वडील स्वतः लांब पल्ल्याचे जलतरणपटू आहेत. त्यांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिले. प्रशिक्षकाचे मार्गदर्शन नसतानाही वडिलांनी दिलेला 'हार मानू नकोस' हा मंत्र तिने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला.

आपल्या भावना व्यक्त करताना प्रियांशी म्हणाली, "मला विंडसर्फिंगचे अक्षरशः वेड आहे. ऑलिम्पिक गोल्ड आणि विंडसर्फिंग यापैकी एकाची निवड करायची झाल्यास मी विंडसर्फिंगचीच निवड करेन, कारण मला त्यातून शांती मिळते."

डकारमधील अनुभवातून धडा घेत आगामी स्पर्धांसाठी अधिक कठोर सराव करण्याचा निर्धार प्रियांशीने व्यक्त केला आहे. योग्य प्रशिक्षक आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळाल्यास भविष्यात ती भारतासाठी पदक निश्चितच जिंकेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे. प्रशिक्षकाअभावी पदक हुकले असले, तरी प्रियांशीने दाखवलेली जिद्द आणि चिकाटी हीच तिच्या यशाची खरी ओळख ठरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.