Contact Banner

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक ; यावल येथील दोन तरुण ठार

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक ; यावल येथील दोन तरुण ठार
 सावदा  प्रतिनिधी, अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन तरूण ठार झाल्याची घटना रात्री १० वाजेच्या सुमारास यावल ते भुसावळ मार्गावरील घोडेपीर बाबांच्या दर्ग्याजवळ घडली. घटनास्थळावरून वाहन चालकाने पळ काढला आहे.पुंडलीक चंद्रकांत सोनवणे (वय १९) व रोशन कैलास सोनवणे ( वय १८) असे मृत दोघं तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर असे की, यावल शहरातील बोरावल गेट परिसरात राहणारे दोन तरुण हे रात्री ९ .४० वाजेच्या सुमारास भुसावळहून यावल कडे (एमएच १९डीएल ३०६७) या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने येत होते. यावल शहरापासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या घोडेपीरबाबांच्या दर्गा जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पुंडलीक सोनवणे व रोशन सोनवणे हे दोघं गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने यावल येथील ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथे पाठविण्यात आले. यात पुंडलीक चंद्रकांत सोनवणे याचा उपचार सुरू करण्याआधीच मृत्यू झाला. तर रोशन कैलास सोनवणे याचा गोदावरी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. या तरूणांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

मयत पुंडलीक हा युवक यावल येथील पत्रकार चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा असून रोशन हा त्यांच्या साडुचा मुलगा आहे. या दोन्ही तरूणांच्या मृत्यूचे वृत्त येऊन धडकताच परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या दोन्ही युवकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.