कारल्याची बी पेर ग सुनबाई कारल्याची बी पेर ग सुनबाई--डॉ. अनिता बेंडाळे,नासिक
कारल्याची बी पेर ग सुनबाई
कारल्याची बी पेर ग सुनबाई.......डॉ. अनिता बेंडाळे,गणेश नगर, नासिक
मुलांसाठी जसा गणेश उत्सव प्रिय आहे तसेच मुली अन महिलांसाठी भुलाबाई! गणेशोत्सव दहा दिवसांचा साजरा होतो, तर भुलाबाई स्थापनेपासून तब्बल एक महिन्यापर्यंत असते. या एक महिन्याच्या काळात शहरा पेक्षा ग्रामीण भागातील वातावरण अतिशय आनंदी, उत्साहाचे असायचे. घरोघरी संध्याकाळी भुलाबाईच्या गाण्यांचे सूर जसजशी सायंकाळ चढत जाऊन रात्र व्हायला लागते तस तसेच चढत जातात. सुरांचे गळ्यात गळे मिसळतात. रस्त्याने चालत असता दिव्याच्या करपट वाती जळण्याचा वास अगरबत्तीचा सुगंध यामुळे सायंकाळ धुंद झालेली असायची.
भुलाबाईच्या गाण्याची सुरुवात म्हणजे पहिली ग पूजा बाई........ देवा देवा शा देवा" सुरू असते तर दुसरीकडे प्रसादाचे अंतिम गाणे. भुलाबाईची गाणी संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. गाणी ही तीच ती असतात जशी 50 कोसावर भाषा बदलते तस तशी गाणीही थोड्याफार अर्थाने बदलत जातात. त्यातच मराठी भाषेचा ठसका हा लावणी सारखा असतो तसाच तो गंभीर, अर्थपूर्ण देखील असतो. त्या गाण्याच्या अंतरंगात तुम्ही शिरलात की मग त्यातील वेगळेपणा, मर्म तुम्हाला भावपूर्ण वाटते अन घायाळ ही करून जाते. म्हणून तर ही गाणी अजरामर आहेत.
झगा, मिडी - मॅक्सी डोक्यावर रिबीनचे फुल बांधलेल्या दोन वेण्या घातलेल्या मुली या टीव्हीवर आणि शेकडो वाहिन्यावर, तसेच हजारो मालिकांच्या जमान्यात दिसत नाहीत परंतु तरीही ही गाणी मात्र अजरामरच आहेत ते त्यातील अंतर्मुख करणाऱ्या कथानकासाठी.....!
आता हेच पहा भुलाबाईचे एक गाणे एक कथानक सजवून जाते, सांगून जाते. हे गाणं हमखास भुलाबाईच्या गाण्यांच्या मालिकेत असतेच. यात वऱ्हाडीची सरमिसळ आहे गाणे कडू कारल्याचे असले तरी त्यात गोडवा आहे. तुमच्या लक्षात आले असणारच ते गाणं कोणतं ते... 'कारल्याची बी पेर गं सुनबाई, मग जाई तुझ्या माहेरा..... या गाण्यातून दारी अंगणात कारल्याचे बी पेरण्याची सूचना सासूने सुनेला केलेली आहे. सासू - सुनेच नाते किती ही गोड असले तरी त्यात चिवट कडवटपणा येतोच किंवा तशी धारणाच होऊन बसली आहे. कदाचीत ते खरेही असू शकते, परंतु हे गाणे जर का बघितले तर सासुबाईंचे चातुर्य आपल्याला 'व्याजस्तुती' अलंकारा प्रमाणे वाटते. वरवर स्तुती अन गर्भित निंदा असे वरवर आपल्याला असेच वाटते की सासू ही किती मायेने सुनेला कारल्याची बी दारी अंगणात पेरण्यास सांगते, परंतु त्यात सासूचा एक वेगळा हेतू तर नाही ना? कारण तिथे ती थांबत नाही, पुढेही सुनेला काम देतेच.
नव्याने घरात आलेली सून असते सासर घरात फारशी रमलेली नसते, उठ सूट तिला माहेरची आठवण येते. उन्हाळ्यातील लग्नापासून आखाजी पर्यंत ती नवऱ्याला घेऊन तीन-चारदा माहेरी गेली असावी, तरीही ती माहेरच्याच गंधात धुंद असते. घरातील वातावरण बदललेले असते अशातच शेवटी सारासार विचार करूनच सासुबाई फर्मान सोडते.
घे फणी घाल वेणी! जाय तुझ्या माहेरा...
घे फणी घाला वेणी जाय तुझ्या माहेरा...
इथेच गाण्याचा शेवटही होतो, परंतु सून आत्ता जाणार तरी कशी? सासूचे चातुर्य मोठ्या खुबिने या गाण्यात दिसते. असे प्रत्येक घरचे कथानक वाटते. भुलाबाईच्या प्रत्येक गाण्यात असे कथानक दडले आहे म्हणूनच ती गाणी आजही अजरामर आहेत,'पाह्यली ग पूजा बाई देवा देवा शा देवा' इथून दाणा पेरत जाऊ सोनाराच्या दारी, किंवा 'इडकीत जाऊ की खिडकीत जाऊ' असे गाणे ह्या मोठ्या खुबीने त्यात एक कथानक दडवले आहे ते आपल्याला दिसते.
शेकडो वर्षापासून सुरू असलेला हा उत्सव खानदेशाची ओळख आहे. भुलाबाई आणि तिचा नवरा भूलो जी राणा हे रूप बाल रूपाला मोहित करते भुलाबाईची गोड गाणी हे लोक परंपरेतील अनमोल ठेवा आहे भुलाबाईची स्थापना करून त्यांच्यासमोर छान गाणी म्हणून खेळतांना मराठी मुलखाचा अभिमान वाटत वारसा जपत असलेली ही गाणी. आपल्या जीवनातील माहेरच्या व सासरच्या माणसांसाठी सुखाची अपेक्षा करावी हे या खेळाचे मूलतत्त्व आहे. शहरीकरणाच्या वेगात मागे पडत जाण्याच्या वेगात आपली परंपरा टिकून ठेवण्यासाठी भुलाबाई हा उत्सव होतो. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा पोहोचेल. ग्रामीण जीवन खुशी, संस्कृती एकत्र कुटुंब पद्धती व त्यातील नातीगोती कोवळ्या वयातील सासुरवाशिनीला माहेरची असलेली ओढ, या अशा कितीतरी बाबींच प्रतिबिंब भुलाबाईच्या गाण्यात प्रकट होते आरती झाल्यावर सुरू होतो बंद डब्यातील खाऊ ची गंमत खानदेशात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
***********************
*डॉ. अनिता बेंडाळे.*
*गणेश नगर, नासिक.*
*मो. नं. ७८८७८८३३०३.*
***********************

कोणत्याही टिप्पण्या नाहीत