अनैतिक संबंधातूनच युवकाचा झाला खून
अनैतिक संबंधातूनच युवकाचा झाला खून
लेवाजगत न्यूज जळगाव- उस्मानिया पार्कमधील अब्दुल गफ्फार अब्दुल जब्बार या युवकाचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेनंतर आठ तासांतच उकल केली. दोन संशयित त्याला शहरातील सुभाष चौकातून कारमध्ये बसवून घेऊन गेले. सुताच्या दोरीने त्याला गळफास देऊन मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर कारमधून मृतदेह ममुराबाद रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. एका संशयिताचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याबाबत त्या युवकाला माहीत झाले होते. तो वाच्यता करणार असल्याचा राग आल्याने त्याने साथीदाराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. शेख शाबीर शेख सुपडू (वय ३३) व शेख (श्रीरामपेठ जामनेर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.
ममुराबाद रस्त्यालगत गुरुवारी अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. तो मृतदेह अब्दुल गफ्फारचा असल्याची ओळख सायंकाळी पटली होती. त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट झाले होते. गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुरुवारपासून स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना झाली होती. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त खबऱ्यामार्फत संशयितांविषयी माहिती मिळाली होती. प्रारंभी उधार, उसनवारी, पैशांच्या विषयांवरून खून झाल्याबाबत पोलिसांना संशय होता. अब्दुलच्या घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. घटनेबाबत इतर पैलूंवर तपास केल्यानंतर अनैतिक संबंधाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. त्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. मृताच्या पत्नीच्या माहेरातील एका युवकावर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात संशयित शेख शब्बीर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर मृताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्याबाबत त्याला माहिती झाले होते. या संबंधांबाबत तो नातेवाइकांकडे वाच्यता करणार असल्याने शेख शब्बीरला राग आला. त्याने भावाची कार जळगाव येथे आणली. सोबत साथीदार शेख फारुख यालाही आणले. त्यांनी सोबत सुताची दोरी आणली होती. त्याने अब्दुल याला जळगाव शहरातील सुभाष चौकात बोलावले. त्याला कारमध्ये बसवून ममुराबाद रस्त्याकडे घेऊन गेले. कारमध्येच दोघांनी त्याला सुताच्या दोरीने गळफास दिला. मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याचा मृतदेह ममुराबाद रस्त्याच्या बाजूला कारमधून फेकून दिला. जाताना त्याचा मोबाइलही सोबत घेऊन गेले होते, अशी कबुली त्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी शेख फारुख यालाही ताब्यात घेतले. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी दोघांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत