लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी विवाहितेची विष पिऊन आत्महत्या
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी विवाहितेची विष पिऊन आत्महत्या
प्रतिनिधी भुसावळ-येथून जवळच असलेल्या शिंदी येथील २२ वर्षीय युवतीचे रविवारी विचवा (ता. बोदवड) येथील युवकाशी लग्न झाले. मात्र रविवारी विवाह झाल्यानंतर माहेरी आल्यावर या नवविवाहितेने राहत्या घरात मंगळवारी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. संबंधित युवतीचे हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी तिने आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले. या घटनेचे कारण स्पष्ट झालेले नाही.
शिंदी (ता. भुसावळ) येथील पूजा रवींद्र चौधरी (वय २२) या युवतीचा यापूर्वी खडका येथील युवकाशी विवाह झाला होता. काही कारणास्तव पती-पत्नी विभक्त झाले होते. त्यानंतर या युवतीचा रविवारी बोदवड तालुक्यातील विचवा येथील मिलन पाटील या युवकाशी दुसरा विवाह झाला. रविवारी लग्न झाल्यावर पूजा पाटील ही नवविवाहिता सोमवारी शिंदी येथे माहेरी आली होती. मात्र बुधवारी पूजाने विषारी द्रव सेवन केले. तिला त्रास जाणवू लागल्याने तात्काळ भुसावळातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिची प्रकृती सुधारल्याने तिला घरी नेण्यात आले. मात्र, घरी आल्यानंतर पुन्हा प्रकृती खालावल्याने तिला बुधवारी उपचारासाठी जळगावला खासगी रुग्णालयात हलवले होते. मात्र उपचार सुरू असतानाच पूजाचा मृत्यू झाला. विवाहानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आजीने केला सांभाळ
पूजाच्या वडीलांचे १३ वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. तर तिची आई माहेरी असते. त्यामुळे पूजासह तिची एक बहीण व भाऊ अशा तिघांचा सांभाळ तिच्या आजीने केला. पूजाने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समोर आलेले नाही. कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांत नोंद नाही जळगाव येथे उपचार सुरू असतांना पूजाचा मृत्यू झाल्याने, जळगावहून कागदपत्रे आल्यावर भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे. जळगाव येथे मृत्यू प्रकरणी नोंद झाली असून तेथून कागदपत्रे आल्यावर तालुका पोलिस तपासाची दिशा ठरवू असे पोलिसांनी सांगितले.
पतीने केले अंत्यसंस्कार
पूजाच्या पार्थिवावर शिंदी येथे गुरुवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार झाले. यावेळी मृत नवविवाहितेचे पती मिलन पाटील यांनी पार्थिवाला अग्नीडाग दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत