अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून! मिल परिसरातील घटना : तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक, एकजण फरार
अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून!
मिल परिसरातील घटना : तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक, एकजण फरार
वृत्तसंस्था धुळे-शहरातील स्टेशन रोडवरील मिल परिसरात पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तिघा भावांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्र गतीने फिरवून दोन संशयितांना अटक केली असून, एक जण फरार आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल साहेबराव पाटील (२२, रा. विद्युतनगर), असे मयत तरुणाचे नाव आहे, तर मयूर मच्छिंद्र शार्दूल, मनोज मच्छिंद्र शार्दूल यांना अटक करण्यात आली असून, मुकेश मच्छिंद्र शार्दूल हा फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार निखिल साहेबराव पाटील याचे आपल्या पत्नीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय मयुरला होता. हा संशय आल्यानंतर २७ जानेवारीपासून निखिल हा घरातून निघून गेला होता. तो कोठे गेला आहे, याची कटुंबाला कुठलीच माहिती नव्हती. याप्रकरणी वडील साहेबराव पाटील यांनी शहर पोलिसात निखील मिसिंग झाल्याची नोंद केली होती.
तर संशयित आरोपींच्या दहशतीला घाबरून निखिलचे कुटुंब त्याच्या काकाच्या घरी रासकरनगर येथे राहण्यास गेले होते.
दरम्यान संशयित आरोपींनी निखीलचा भाऊ दीपक पाटील याला रासकरनगरमध्ये त्याच्या काकाच्या घरी जावून मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यानंतर संशयितांनी समझोत्यासाठी निखिलला बोलवायला सांगितले. निखिल शुक्रवारी सायंकाळी धुळ्याला आल्यानंतर मयूर शार्दूल हा त्याला शुक्रवारी रात्री मावशीच्या घरी घेवून गेला. तेथे मयुर, मनोज, मुकेश या तिघांनी निखिलला लाकडी दांडक्याने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन, त्याचा खून केला. खुनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मिल परिसरात एकच खळबळ उडाली.
शनिवारी दीपक पाटील याने धुळे शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून मयूर मच्छिंद्र शार्दूल, मनोज मच्छिंद्र शार्दूल मुकेश मच्छिंद्र शार्दूल यांच्याविरुद्ध भादंवि ३०२, ३२६, ३६४ (अ) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत. याप्रकरणी मयूर व मनोज याला अटक करण्यात आली आहे, तर मुकेश फरार झाला आहे.
मयूरची माफी मागण्यासाठी निखिल इंदूरहून धुळ्याला आला
तुम्ही निखिलला बोलावून घ्या, जर त्याने माझ्या पत्नीशी असलेले सबंधाबाबत खरे सांगितले तर निखिलला माफ करू असे मयूरने सांगितले. त्यावर विश्वास ठेवत निखिल शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास इंदूरहून धुळ्याला आला. त्यांनतर मयूर यांने त्या भागात असलेल्या जीमजवळ निखिलला मारहाण करीत त्याचा खून केला.
मयूर शार्दुलवर अनेक गुन्हे दाखल
संशयित मयूर शादूर्ल हा मिल परिसरात दारू विक्रीचा अवैध व्यवसाय करतो. यापूर्वी पोलिसांनी दोन वेळा त्यांच्या घरातून देशी दारुचा कारखाना उदध्वस्त केला होता. या प्रकरणात त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक देखील केली होती. तर मयूर शार्दूल फरार झाला होता. शहर पोलिसात शार्दुलवर अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षापासून मिल परिसर भागात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने पोलिसांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
..तर खुनाची घटना घडली नसती
मिल परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चितोडरोडवर पोलीस चौक उभारण्यात आली आहे. याच पोलीस चौकीच्या काही अंतरावर स्वराज्य जीमच्या सार्वजनिक ठिकाणी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निखिल पाटील याचा खून झाल्याची घटना घडली. वास्तविक काही अंतरावरच घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असती तर कदाचित खुनाची घटना घडली नसती, अशी चर्चा सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत