क्रॅश कुपन पाठवून ९२ हजार रुपयांत गंडवले
क्रॅश कुपन पाठवून ९२ हजार रुपयांत गंडवले
लेवाजगत न्यूज जळगाव-भगीरथ कॉलनीतील दवाखान्यात व्यवस्थापक असलेल्या महिलेच्या घरी भामट्याने रजिस्टर पोस्टाने ६ लाख ५० हजार रुपये जिंकल्याचे क्रॅश कुपन कार्ड पाठवले. त्यानंतर हेल्पलाइन क्रमांकावर महिलेची बँक खात्याविषयी माहिती मागवून टॅक्सच्या नावाखाली ९२ हजार रुपये ऑनलाइन पाठवण्यास भाग पाडून गंडा घातला. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
शीतल राजेश काबरा ( रा. भगीरथ कॉलनी) या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक आहेत. त्यांच्या घरी २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता रजिस्टर पोस्टाने एक बंद पाकीट आले होते. त्यांनी ते पाकीट उघडून बघितले. त्यात नापतोल प्रा. ली. कंपनीचे पत्र व एक क्रॅश कुपन कार्ड आढळून आले. काबरा यांनी ते कुपन क्रॅश केले. त्यावर त्यांनी ६ लाख ५० हजार रुपये जिंकले असल्यासह एमएस कोड व क्रमांक लिहिलेला होता. त्या पत्रावरील हेल्पलाइन क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. हेल्पलाइन असलेल्या व्यक्तीने काबरा यांना त्यांच्या बँक खात्याबाबत माहिती मागितली. त्यांनीही त्या व्यक्तीला बँक खात्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने फोन केला. वेगवेगळ्या स्वरुपाचे कर सांगून त्याने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर गुगल पेने रक्कम पाठवण्यास सांगितली. त्याच्या सांगण्यानुसार त्यांनी चार वेळेस गुगल पे द्वारे ९२ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. ९२ हजार रुपये पाठवूनही साडेसहा लाखांचे बक्षीस काबरा यांना मिळाले नाही. फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत