पालिका निवडणुकांचा बिगुल वाजला ; प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
पालिका निवडणुकांचा बिगुल वाजला ; प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
लेवाजगत न्यूज मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या नगरपालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला असून यामुळे लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे .
जिल्ह्यातील १५ नगरपालिकांचा समावेश असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे .
कोरोनाच्या आपत्तीमुळे मार्च २०२० पासून ते डिसेंबर २०२१ पर्यंत राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबीत आहेत . यातच मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप कमी झाला असला तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात येतील अशी स्थिती निर्माण झाली . याच वातावरणात राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या . यानंतर जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती . यातील जिल्हा परिषदेचे गट आणि गणांचा कार्यक्रम मध्यंतरी पार पडला असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता असली तरी नगरपालिकेबाबत अद्यापही सस्पेन्सचे वातावरण होते . या पार्श्वभूमिवर , आज राज्य निवडणूक आयोगाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून नगरपालिका निवडणुकांमधील महत्वाचा घटक असणाऱ्या राज्यातील अ , ब आणि क वर्गात येणाऱ्या नगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे .
यात अ वर्ग नगरपालिकांचे मुख्याधिकारी २ मार्चपर्यंत प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार असून आयोग याला ७ मार्च २०२२ रोजी मान्यता देणार आहे . यावर १० ते १७ मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील . यावरील सुनावणी २२ मार्च रोजी होईल . जिल्हाधिकारी याला २५ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील . तर १ एप्रिल २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे . हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी ५ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करतील . दरम्यान , ब आणि क वर्गातील नगरपालिकांसाठी हाच कार्यक्रम असून यात राज्य निवडणूक आयोगाकडे नव्हे पहील्यादा जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे . अर्थात , यासाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी २ मार्चपर्यंत प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार असून ते याला ७ मार्च २०२२ रोजी मान्यता देणार आहे . यावर १० ते १७ मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील . यावरील सुनावणी २२ मार्च रोजी होईल . तर १ एप्रिल २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे . हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी ५ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करतील . यामुळे निवडणुका एप्रिलचा अखेरचा आठवडा अथवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे . जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता , भुसावळ ही अ वर्गातील नगरपालिका असून यासोबत अमळनेर , चोपडा , चाळीसगाव , पाचोरा , भडगाव , वरणगाव , धरणगाव , एरंडोल , फैजपूर , पारोळा , रावेर , सावदा , यावल आणि नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नशिराबाद येथे निवडणुका होणार आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत