पती-पत्नीच्या वादाने 'चिराग' विझला अन् 'खुशी' हरपली
पती-पत्नीच्या वादाने 'चिराग' विझला अन् 'खुशी' हरपली
वृत्तसंस्था पाचोरा-पती अन् पत्नीच्या वादातून बोरखेडा (ता.चाळीसगाव) येथील एका २७ वर्षीय तरुणाने आपल्या ६ वर्षाचा मुलगा चिराग अन् ४ वर्षाच्या खुशी नावाच्या मुलीसह नगरदेवळा रेल्वे स्टेशनवर धावत्या सचखंड एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली. पती-पत्नीत गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती तर पती दोन्ही मुलांसह आपल्या मूळ गावी आला होता. तसेच पत्नीने पतीविरुद्ध पोलिसांतही कालच तक्रार केली होती. या वादातून अखेर तरुणाने दोन्ही मुलांसह आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेत रविवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता जीवनयात्रा संपवली. जितें-द्र दिलीप जाधव, चिराग जाधव व खुशी जाधव ही मृत झालेल्यांची नावे आहेत. बोरखेड्याचा जितेंद्र अन् पिंपळगाव (ता.पाचोरा) येथील पूजा यांचा २०११ मध्ये विवाह झाला. त्यांना दोन मुलेही झाली. पती-पत्नीत अधूनमधून वाद सुरू असायचे. जितेंद्र हा रोडरोलर चालक होता. रस्त्याची कामे सुरू असल्याने ते डोणपिंप्रीत वास्तव्य करीत होते. पुन्हा वाद झाल्याने पूजा माहेरी निघून गेली होती तर जितेंद्र दोन्ही मुलांसह बोरखेड्याला आला होता. रविवारी जितेंद्रने दोन्ही मुलांना नाष्टा खाऊ घातला व नगरदेवळा स्टेशनवर घेऊन गेला व सकाळी दोन्ही मुलांसह त्याने धावत्या एक्स्प्रेसखाली झोकून देत आत्महत्या केली.
पत्नी पूजाने दिली दुपारी २.३० वाजता पती विरुद्ध तक्रार : पूजाने ती शनिवारी (दि. १२) चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन पिंपळगाव येथे माहेरी निघून आली होती. जितेंद्र याने रविवारी मुलांसह आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर पूजाने पुन्हा रविवारी दुपारी अडीच वाजता पती मला दारू पिऊन मारहाण व शिवीगाळ करतात व नेहमी रेल्वेखाली आत्महत्या करण्याची धमकी देतात, अशी तक्रार दाखल केली.
खुशीच्या वाढदिवशीच संपवली जीवनयात्रा
खुशीचा रविवारी वाढदिवस होता. सकाळी बोरखेडा येथील बसस्थानकावर वडील दिलीप जाधव यांच्या हॉटेलवर ८ वाजता जितेंद्रने खुशी व चिरागला पाव वडा खाऊ घातला व ते बाहेर पडले. त्यानंतर जितेंद्र व दोन्ही मुले रिक्षाने नगरदेवळा रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यानंतर ही घटना घडली.
  
कोणत्याही टिप्पण्या नाहीत