पुण्याच्या फ्रेंडशीप क्लब रॅकेटचा सूत्रधार चोपडा तालुक्यातील ! : पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्याच्या फ्रेंडशीप क्लब रॅकेटचा सूत्रधार चोपडा तालुक्यातील ! : पोलिसांनी ठोकल्या बेड्या
लेवाजगत न्यूज चोपडा -फ्रेंडशीप क्लबच्या नावाखाली महिलांशी संबंध जोडून देण्याच्या आमीषाने लोकांना लुबाडणाऱ्या टोळीचा म्होरक्या अनुप सुकलाल मनोरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तो चोपडा तालुक्यातील रहिवासी आहे. यातच त्याने जळगावातील काही जणांना पैसे दिल्याची माहिती समोर आली असून पोलीस या दिशेने तपास करत आहेत.
अनुप सुकलाल मनोरे ( वय ३५ ) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा चोपडा येथील रहिवासी असून सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे . तो लेखक आणि पटकथा लेखक असून त्याची मनोरंजन क्षेत्रात बऱ्यापैकी पोहच आहे. मात्र झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने चुकीचा मार्ग निवडला. यात अनेक वर्षे त्याने भरपूर पैसा कमाविला. मात्र आता त्याला अटक करण्यात आली आहे. अनुप मनोरे याने मीनाक्षी फ्रेंडशीप क्लब नावाने आपले मायाजाल निर्मित केले होते. यात सेक्ससाठी महिलांची सेवा पुरविण्यात येत असल्याच्या जाहिराती तो सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असे. या जाळ्यात कुणी अडकले तर तो त्यांना ब्लॅकमेल करून महिलांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बँक अकाऊंटमध्ये पैसे मागवत असे.
धक्कादायक बाब म्हणजे तो २०१० पासून हा धंदा करत असून अद्यापही याबाबत कुणी तक्रार करण्यासाठी समोर आला नव्हता. अलीकडेच त्याने एका धनाढ्य व्यक्तीला वलयांकीत महिलेसोबत संबंध जोडून देण्याचे आमीष दाखवून सुमारे ६० लाख उकळले. यात आपली फसवणूक झाल्याचे समजताच संबंधीत व्यक्तीने पुणे येथील सायबर सेलला तक्रार केल्याने अखेर अनुप मनोरे याचा भंडाफोड झाला आणि त्याला अटक करण्यात आली आहे .
दरम्यान , मनोरे याने या धंद्यातून मिळालेल्या पैशातून रायगड येथे जमीन घेतली असून त्याने जळगाव जिल्ह्यातील काही जणांना पैसे देखील दिल्याची माहिती समोर आली आहे . तर त्याला न्यायालयाने उद्या म्हणजे २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत