रिक्षा चोरणारा मालेगावाचा सराईत जेरबंद, ६ रिक्षा जप्त चोरलेल्या रिक्षा भाडेतत्त्वावर दिल्या चालवण्यास
रिक्षा चोरणारा मालेगावाचा सराईत जेरबंद, ६ रिक्षा जप्त चोरलेल्या रिक्षा भाडेतत्त्वावर दिल्या चालवण्यास
वृत्तसंस्था नाशिक - शहर व परिसरातून रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा माग काढला त्याला खडकाळी भागातून अटक केली. राजेंद्र मधुकर हिरे (रा. सोयगाव, ता. मालेगाव) असे या संशयिताचे नाव आहे. विशेष म्हणजे चोरी केलेल्या रिक्षा संशयिताने मालेगावला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अन्सार शेख या रिक्षाचालकाची रिक्षा (एमएच १५ एके ६९९७) पिंपळ चौकात पार्क केली असताना ती चोरी झाल्याचे लक्षात आले. शेख यांनी याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने रिक्षा चोरीस गेली त्या घटनास्थळावरील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले. संशयिताच्या वर्णनाच्या आधारे त्याचा शहरात शोध घेतला. रिक्षा चोरी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्यात आले. पोलिस पथकाला संशयित हा शहराबाहेर असल्याची माहिती मिळाली असता पथकाने संशयिताचा माग काढला व त्याला सोयगाव येथे अटक केली. चौकशीत त्याने चोरी केलेल्या रिक्षा सोयगाव, मालेगाव येथे भाडेत्त्ववावर चालकांना चालविण्यास दिल्याचे तपासात आढळून आले. वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार, दिलीप ठाकूर, ज्ञानेश्वर मोहिते, युवराज पाटील, लक्ष्मण ठेपणे, रमेश कोळी, विशाल काठे, संदीप शेळके, गणेश निंबाळकर, सागर निकुंभ, उत्तम खरपडे यांच्या पथकाने उपआयुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
सहा रिक्षा हस्तगत
संशयिताकडून भद्रकाली २, पंचवटी १, सरकारवाडा १ असे चार गुन्हे उघडकीस आले. मालेगाव येथून एमएच १५ झेड ६१९७, एमएच १५ झेड६९९९, एमएच १५ झेड ६६२८ एमएच १५ एके ५१७१, एमएच १५ वाय २५५५, एमएच १५ झेड ७९४५ या सहा रिक्षा पथकाने हस्तगत केल्या आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत