स्वर'लते'ची भैरवी ९२ व्या वर्षी घेतला निरोप
स्वर'लते'ची भैरवी
९२ व्या वर्षी घेतला निरोप
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गेली आठ दशके आपल्या दैवी स्वरांची पखरण करून पृथ्वीवर सुरांचा स्वर्ग निर्माण करणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज (६ फेब्रुवारी) सकाळी निधन झालं. वयाच्या ५व्या वर्षापासून स्वरांची आराधना करणाऱ्या लतादीदींनी विविध भाषांमधील ३० हजारांहून अधिक गाणी आपल्या सुरांनी अजरामर केली आहेत. वयाच्या ९२व्या वर्षीही करोनावर त्यांनी मात केली; मात्र काल त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि आज हा दैवी सूर शांत झाला.
लता मंगेशकर जवळपास महिनाभर आजारी होत्या. ८ जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच क्रँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया झाला होता. लतादीदींचे वय पाहता डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. तेव्हापासून त्या सतत संघर्ष करत होत्या. उपचारादरम्यान त्यांना अवघ्या २ दिवसांसाठी व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ढासळू लागताच लतादीदींना व्हेंटिलेटरवर आणण्यात आले आणि आज चित्रपटसृष्टी आणि संगीत जगताला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली, लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शांतता पसरली आहे.
समाज माध्यमातून लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहते आणि सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. चाहत्यांचे डोळे ओले झाले आहेत. आज प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू आहेत. लता मंगेशकर यांचा त्यांच्या चाहत्यांच्या कानात गुंजन करणारा सुमधुर आवाज आता कायमचा शांत झाला आहे.
*वयाच्या ५व्या वर्षी सुरू झालेला प्रवास..*
लता मंगेशकर यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. जे कधीच विसरता येणार नाही. ८ दशकांच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी ३० हजार पेक्षा अधिक गाणी गायली. लतादीदींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्या तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ठरल्या होत्या. याशिवाय त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतरत्नानेही सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी काम करायला सुरुवात केली. ज्या वयात मुले खेळतात, शिकतात त्या वयात लता मंगेशकर यांनी घराची जबाबदारी घेतली. आपल्या भावंडांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी कधीही लग्न केले नाही.
"आनंदघन" या नावाने त्यांनी गाणी संगीतबद्ध केली होती. भारतरत्न गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांची अनेक गाणी अजरामर आहेत. सुमधूर सुरांनी त्यांनी या गाण्यांमधून संपूर्ण विश्वालाच वेड लावलं आहे. म्हणूनच त्यांना जगभरात गानकोकीळा या नावाने ओळखलं जातं. त्यांची सर्वच गाणी सुपरहिट आहेत. लता दीदींच्या या गाण्यांनी त्यांना या जगात अजरामर केले आहे. त्यापैकी मराठीत गजानना श्री गणराया (भक्तीगीत), चिंब पावसानं रान झालं आबादानी (सर्जा), ऐरणीच्या देवा तुला (साधी माणसं), श्रावणात घन निळा (भावगीत), आज गोकुळात रंग खेळतो हरी (भावगीत), लटपट लटपट तुझे चालणे (अमर भूपाळी), वेडात मराठे वीर दौडले (स्फूर्तीगीत), मोगरा फुलला (संतवाणी), मी रात टाकली (जैत रे जैत), मेंदीच्या पानावर (भावगीत), चाफा बोलेना (भावगीत), जीवनात ही घडी (कामापुरता मामा), घन ओथंबून येती (भावगीत), लेक लाडकी या घरची (कन्यादान), सख्या रे घायाळ मी हरणी (सामना) यांच्यासोबतच हिंदी चित्रपटातील उठाए जा उनके सितम (अंदाज), हवा में उड़ता जाए (बरसात), आएगा आएगा आएगा आने वाला (महल), घर आया मेरा परदेसी (आवारा), तुम न जाने किस जहाँ में (सजा), ये जिंदगी उसी की है (अनारकली), मन डोले मेरा तन डोले (नागिन), मोहे भूल गए साँवरिया (बैजू बावरा), यूँ हसरतों के दाग (अदालत), जाएँ तो जाएँ कहाँ (टैक्सी ड्राइवर), प्यार हुआ इकरार हुआ (श्री ४२०), रसिक बलमा (चोरी चोरी), ऐ मालिक तेरे बंदे हम (दो आँखे बारह हाथ), आ लौट के आजा मेरे गीत (रानी रूपमती), प्यार किया तो डरना क्या (मुगल ए आजम), ओ बसंती पवन पागल (जिस देश में गंगा बहती है), ज्योति कलश छलके (भाभी की चूड़ियाँ), अल्लाह तेरो नाम (हम दोनों), पंख होते तो उड़ आती रे (सेहरा), बिंदिया चमकेगी (दो रास्ते), चलते चलते (पाकीजा), सुन साहिबा सुन (राम तेरी गंगा मैली), कबूतर जा जा(मैंने प्यार किया), मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियाँ है (चाँदनी), यारा सीली सली (लेकिन), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन), मेरे ख्वाबों में जो आए (दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे), दिल तो पागल है (दिल तो पागल है), जिया जले जाँ जले (दिल से), हमको हमीं से चुरा लो(मोहब्बतें) अशा हजारो 'सदाबहार' गाण्यांचा वारसा लता मंगेशकर यांनी रसिकांसाठी सोडला आहे.
*लता मंगेशकर यांना मिळालेले पुरस्कार*
फिल्म फेअर पुरस्कार (१९५८ , १९६२, १९६५, १९६९, १९९३ आणि १९९४)
राष्ट्रीय पुरस्कार (१९७२, १९७५ अाणि १९९०)
महाराष्ट्र सरकार पुरस्कार (१९६६ आणि १९६७)
पद्म भूषण (१९६९)
१९७४ मध्ये जगभरात सर्वात जास्त गाणी गायलाचा विश्वविक्रमाची गिनीज़ बुक रिकॉर्डमध्ये नोंद
१९८९ दादासाहेब फाळके पुरस्कार
१९९३ मध्ये फिल्म फेअर चा लाइफ टाइम अचीवमेंट पुरस्कार
१९९६ मध्ये स्क्रीन चा लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार
१९९७ मध्ये राजीव गांधी पुरस्कार
१९९९ मध्ये एन.टी.आर. पुरस्कार
१९९९ मध्ये पद्म विभूषण
१९९९ मध्ये झी सिने चा लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार
२००० मध्ये आई. आई. ए. एफ. चा लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार
२००१ मध्ये स्टारडस्ट चा लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार
२००१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरिक सम्मान "भारत रत्न"
२००१ मध्ये नूरजहाँ पुरस्कार
२००१ मध्ये महाराष्ट्र भूषण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत