वसतिगृहात झाडावरून पडल्याने कर्मचारी गंभीर
वसतिगृहात झाडावरून पडल्याने कर्मचारी गंभीर
प्रतिनिधी । रावेर
येथील आदिवासी वसतिगृहातील सफाई कर्मचारी दुपारी वसतिगृहाच्या आवारात असलेल्या झाडावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शामराव आटवाल (वय ४५) असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
येथे आदिवासी विभागाचे मुले- मुलींसाठी एकाच आवारात दोन स्वतंत्र वसतिगृहे आहेत. मुलांच्या वसतिगृहात साफसफाई व स्वच्छतेसाठी क्रिस्टल कंपनीतर्फे शामराव अटवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुलींच्या वसतिगृहात तत्कालीन अधीक्षक घाटे यांच्या बहीण अनधिकृतपणे वास्तव्यास आहेत. त्या कर्मचाऱ्यांवर अरेरावी करत असून त्यांनीच अटवाल यांना झाडावर चढण्यास सांगितले होते. मात्र अटवाल यांचा तोल गेल्याने ते खाली जमिनीवर पडले. त्यात त्यांच्या कानातून रक्त येत असल्याने त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी
नेण्यात आले होते. डॉ.सर्वेश अरकडी यांनी त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले आहे.
मुलांच्या वसतिगृहासाठी अधीक्षक म्हणून सपकाळे यांची तर मुलींच्या वसतिगृहात अधिक्षिका म्हणून वैशाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र हे दोघेही अधीक्षक येथे आठ-आठ दिवस येतच नाहीत. मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक सपकाळे यांना घटनेबाबत विचारले असता मी आज बोदवडला आहे, माझे काम असते तेव्हा मी रावेरला येतो. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी मला याची माहिती दिली आहे. सफाई कर्मचारी कंपनीचा नियुक्त असल्याने त्याची माहिती कंपनीला दिली, असे उत्तर सपकाळे यांनी दिले. तर मुलींच्या वसतिगृहातील झाडावरून पडल्याने या वसतिगृहाच्या अधीक्षिका वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॉल घेतला नाही. अटवाल यांची प्रकृती गंभीर असून गोदावरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत